धाराशिव (प्रतिनिधी)- देशातील 151 खासदारांचे निलंबन रद्द करण्यात येऊन लोकशाही संसदेचे पावित्र्य राखावे या मागणीसाठी 92 वर्षीय ज्येष्ठ समाजवादी नेते व समाजसेवक पन्नालाल सुराणा यांनी धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र सरकारच्या निषेधार्थ काळ्या फिती लावून दि.22 डिसेंबर रोजी निषेध नोंदविला.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, भारताने माहिती तंत्रज्ञानात मोठी कामगिरी केली. तसेच चंद्रावर देखील पाऊल ठेवल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. परंतू आपल्या प्रजासत्ताकाचे पवित्र मंदिर असलेल्या संसद भवनात अवघ्या चारचणांनी जबरदस्तीने घुसून पिवळा गॅस पसरवितात ही सगळ्यांच्या तोंडावर मारलेली लाजीरवाणी थापड आहे. त्याचे आम्हाला दु:ख आहे. त्या घटनेबद्दल गृहमंत्री अमित शहा सभागृहात प्रांजळ निवेदन द्यायला तर नकार देतातच. शिवाय कोट्यवधी मतदारांनी निवडून दिलेल्या 154 खासदारांचा संसद भवनात प्रवेश करायला मनाई करतात. त्याबद्दल भारतीयांच्या मनात प्रचंड संताप आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनो शुध्दीवर, खासदारांचे केलेले निलंबन रद्द करा यासह विविध घोषणा देऊन केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी सोशालीस्ट पार्टी इंडियाचे पन्नालाल सुराणा यांच्यासह राष्ट्रसेवा दलाचे सहसचिव गुंडू पवार, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ॲड अजय वाघाळे, समाजवादी पार्टीचे प्रदेश महासचिव ॲड. रेवन भोसले, ॲड माधवी उंबरे, दिलीप कांबळे, सिद्धेश्वर बेलुरे, अब्दुल लतिफ, गणेश वाघमारे, विजय गायकवाड, गणेश ठाकूर आदी उपस्थित होते.