धाराशिव (प्रतिनिधी)- देशाच्या विकासासाठी महत्वपूर्ण भूमिका बजाबवणारा प्रत्येक खेळाडूंकडे आधुनिक साहित्य असेलच असे नाही, उपलब्ध साहित्यावर सराव करणारा खेळाडूही मैदानावर घाम गाळत असतो. मेहनतीत पुढे असणारे परंतु आर्थिक दुर्बल खेळाडू आधुनिक साहित्याच्या अभावामुळे मागे पडतात अश्या खेळाडूंच्या मागे मी नेहमीच भक्कम पने उभा राहील असे आमदार कैलास पाटील यांनी मत व्यक्त केले. 

धाराशिव जिल्हा धनुर्विद्या संघटना आणि पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने धाराशिव येथील पोलीस ग्राउंडवर आयोजित 22 व्या राज्यस्तरीय सब ज्युनिअर धनुर्विद्या स्पर्धेचे उदघाटन आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हसन, भारतीय धनुर्विद्या महासंघाचे तथा महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेचे महासचिव प्रमोद चांदुरकर, कोषाध्यक्ष रंगराव साळुंके, सिनियर नॅशनल कोच प्रवीण शर्मा, जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे कोषाध्यक्ष गुलचंद व्यवहारे, सचिव प्रवीण गडदे, सहसचिव अभय वाघोलीकर, शिवसेना पक्षाचे माजी शहराध्यक्ष प्रवीण कोकाटे, आंतरराष्ट्रीय कोच प्रवीण सावंत, आंतरराष्ट्रीय खेळाडू अदिती स्वामी, खेड ग्राम पंचायत सरपंच सुनील गरड, नितीन जामगे आदींसह संघटनेचे पदाधिकारी, प्रशिक्षक, खेळाडूंची प्रमुख उपस्थिती होती. 26 डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेचा प्रारंभ रिकर्व्ह राउंड प्रकारापासून चालू करण्यात आल्या असून स्पर्धेसाठी राज्यभरातून 750 खेळाडू, पंच, स्कोरर, पदाधिकारी, संघ व्यवस्थापक आणि मार्गदशक धाराशिव जिल्ह्यात दाखल झाले आहेत. स्पर्धेतून रायपूर, छत्तीसगड येथे 4 जानेवारी ते 12 जानेवारी दरम्यान होत असलेल्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्याचा संघ निवडण्यात येणार आहे.

स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी राखीव पोलीस निरीक्षक अरविंद दुबे, जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे सचिव प्रवीण गडदे, सहसचिव अभय वाघोलीकर, जिल्हा तांत्रिक समिती अध्यक्ष नितीन जामगे, सचिव कैलास लांडगे यांच्यासह खेळाडू पालक आणि पदाधिकारी परिश्रम घेंगत आहेत. अर्जुन पुरस्कार विजेती वर्ल्ड चॅम्पियन, एशियन चॅम्पिअन अदिती स्वामी व तिला घडविणारे आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक प्रवीण सावंत, मराठवाड्यातील पहिला आंतरराष्ट्रीय धनुर्धर आर्यन गरड यांचा गौरव आमदार कैलास पाटील, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्ह्याच्या आंतरराष्ट्रीय खेळाडू आर्यन गरड यास आमदार कैलास पाटील यांच्या आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत रुपये 3 लक्ष किमतीचे आधुनिक धनुष्य यावेळी देण्यात आले. स्पर्धेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय धनुर्धरांच्या सहभागानेही स्पर्धेस रंगत येत असून मंगळवार पर्यंत स्पर्धेचा थरार धाराशीकरांना पाहावयास मिळणार आहे.


 
Top