धाराशिव (प्रतिनिधी)- कांद्यावरील निर्याद बंदी हटवा अशी मागणी वाणिज्य मंत्रालय व वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याकडे खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी केली आहे.
केंद्र सरकारने 2014 साली जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळले असून भारतीय कांद्यास मोठ्या प्रमाणात जागतिक बाजारपेठेमध्ये मागणी आहे भारतामध्ये महाराष्ट्र सह कर्नाटक राजस्थान मध्य प्रदेश आदी राज्यांमध्ये जवळपास 300 लक्ष टन एवढे कांद्याचे उत्पादन होते. त्यापैकी 40 टक्के उत्पादन हे केवळ महाराष्ट्रात होते. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव व लासलगाव तसेच सोलापूर या कांद्याच्या देशांतर्गत सर्वात मोठ्या बाजारपेठा असून लासलगाव ही आशिया खंडातील सर्वात मोठे कांद्याची बाजारपेठ आहे. देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेस लासलगाव येथून कांदा निर्यात होत असतो यावर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचा काढणीस आलेला कांदा हा शेतावरती सडून गेल्यामुळे तसेच बाजारपेठेमध्ये नेणे योग्य कांदा नसल्यामुळे कांद्याचे दर व देशांतर्गत मागणी वाढल्यामुळे कांद्याचे दर वाढलेले आहेत.
या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाकडून मागील आठवड्यामध्ये कांदा निर्याती वरती 31 मार्च 2024 पर्यंत बंदी घालण्यात आली आहे. भाजप सरकारने हे केवळ लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तसेच काही व्यापारी दबाव गटांच्या मागणीसाठी हा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या अधिवेशन काळामध्ये धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी वाणिज्य मंत्रालय व वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना पत्राद्वारे कांदा निर्यातीवरील बंदी तात्काळ मागे घेवून महाराष्ट्रातील दुष्काळ व अवकाळी सारख्या नैसर्गिक आपत्तीतून जाणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देणेबाबत विनंती केली आहे.
