भूम (प्रतिनिधी)- गोरमाळा ग्रामपंचायत सरपंच अमोल औताडे यांच्या विरोधात दाखल केलेला अविश्वास ठराव विरोधी गटाने जिंकला असून 6 मतांनी ठराव मंजूर झाल्याने राष्ट्रवादी कॉग्रेसच्या ताब्यात असलेली गोरमाळा ग्रामपंचायत विरोधी गटाकडे गेली आहे.
गोरमाळा सरपंच यांच्या विरोधात दि. 8 डिसेंबर रोजी ग्रामपंचायत सदस्य सारिका सुभाष औताडे, गंगुबाई बनसोडे, शालन पांढरे, शिवाजी शेळके, कुंडलिक चोरमोले या पाच सदस्यांनी सरपंच अमोल औताडे यांच्या विरोधात विकासकाम करताना विश्वासात न घेणे या सह इतर कारण दाखवत तहसिलदार सचिन खाडे यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. त्या नुसार दि 13 डिसेंबर रोजी तहसिलदार यांच्या उपस्थित ग्रामपंचायत कार्यालय गोरमाळा येथे या दाखल केेलेल्या अविश्वास ठरावाबाबत मतदान घेण्यात आले. यामध्ये अविश्वास ठरावाच्या बाजून 6 मतदान पडले विरुद्ध 1 मतदान पडल्याने सरपंच अमोल औताडे यांच्या विरोधात ठराव पास झाला. यावेळी तहसिलदार सचिन खाडे, प्रभारी नायब तहसिलदार एस. टी. स्वामी, अव्वल कारकून जिकरे व ऑपरेटर सागर बागडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. अविश्वास ठरावाची प्रक्रीया पुर्ण झाल्यानंतर गोरमाळा ग्रामपंचात परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण होते.
