भूम (प्रतिनिधी)- तालुक्यातील ईट ग्रामपंचायतीचे सरपंच संजय आसलकर यांच्यावरील अविश्वास ठराव नामंजूर होताच जेसीबीतून गुलालाची उधळण करत त्यांची उंटावरून मिरवणूक काढली. 

ईट ग्रामपंचायतीमध्ये 15 सदस्य आहेत. या सदस्यातून सरपंच, उपसरपंचांची निवड झाली आहे. सरपंचपद हे ओबीसींसाठी राखीव असल्याने सत्ताधारी गटाचे संजय आसलकर यांची निवड झाली होती. परंतु सत्ताधाऱ्यांमध्ये काही काळातच हेवेदावे सुरू झाले. राजकीय संघर्ष होऊन आरोप-प्रत्यारोपाने ईट ग्रामपंचायत चांगलीच गाजली. त्यातून सरपंच संजय आसलकर यांच्यावर 15 पैकी 13 सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला. अविश्वास ठराव मंजूर होऊ नये म्हणून सरपंच संजय आसलकर यांना ग्रामपंचायतीचे सदस्य सयाजीराजे हुंबे यांची खंबीर साथ मिळाली. डावपेच आखत अविश्वास दाखल करणाऱ्या 13 सदस्यांपैकी तीन सदस्य गळाला लावल्याने सरपंच संजय आसलकर यांच्यावरील अविश्वास ठराव बारगळला. ईट ग्रामपंचायतीच्या या राजकीय नाट्यानंतर सरपंच संजय आसलकर व ग्रामपंचायत सदस्य सयाजीराजे हुंबे यांची जेसीबीमधून गुलालाची उधळण करत उंटावरून ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ग्रामस्थांची गर्दी झाली होती.


 
Top