भूम (प्रतिनिधी)-तालुक्यातील 74 ग्रामपंचायतमधील 96 गावात स्वच्छतेसाठी राबविण्यात आलेल्या हागणदारीमुक्त गाव योजनेचा पुरता बोजवारा उडाला आहे. तालुक्यात केंद्र व राज्य सरकार स्वच्छतेविषयी अनेक योजना राबवत असून, या योजनेवर कोट्यवधींचा निधी खर्च होत आहे. अशीच स्वच्छतेची हागणदारीमुक्त गाव योजना शासनाने राबविली जात आहे. यामध्ये तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता. मात्र, आजही तालुक्यातील शंभर टक्के गावे हागणदारीमुक्त झालेली नाहीत.
याबाबत पंचायत समिती स्तरावर कोणत्याही प्रकारची संबंधितांकडून चौकशी करण्यात येत नाही. अनेक गावात केवळ हागणदारी मुक्तीचे फलकच लावण्यात आले असून, अनेक पुरस्कार प्राप्त गावांमधील नागरिक हातात टमरेल घेऊन जातानाचे चित्र पहावयास मिळत आहे. शासनाने तालुक्यातील संपूर्ण गावे हागणदारीमुक्त करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरील स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमांतर्गत घरोघरी शौचालय बांधण्यासाठी शासनाने लाभार्थ्यांना बारा हजार रुपये अनुदान दिले आहे. अनेक ग्रामस्थांनी हे अनुदान शौचालय न उभारता अनुदान लाटले आहे. अनुदान देण्याचा अधिकार ग्रामसेवकांना असून, ते अनुदान लाभार्थ्यांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करूनच द्यावे लागते. परंतु, ग्रामसेवक व सरपंच यांनी काही ठेकेदाराला तर काही गावात राजकिय स्वार्थासाठी नागरिकांना हाताशी धरून निकृष्ट दर्जाच्या नाममात्र शौचालयांची उभारणी केली आहे. त्यामुळे तालुक्यातील प्रत्येक गावातील अनेक शौचालयांची पडझड झाल्याचे दिसून येत आहे. परिणामी, शौचालयाचा वापर होत नसल्याने गावा-गावातील नागरिकांच्या हातात टमरेल पाहायला मिळत आहे.
आमच्या गावात अनेक ग्रामस्थांनी बोगस शौचालयाचे अनुदान लाटले आहे. परंतु याची कोणी चौकशी करत नसल्याने अशा नागरिकांचे फावत आहे. परंतु अशा नागरिकांमुळेच आरोग्य धोक्यात येत आहे. - व्हि.के. पाटील, नागरिक.
तालुक्यातील बऱ्याच गावात अनुदान उचलण्यापुरते बोगस प्रस्ताव सादर करून अनुदान उचलले आहे. परंतु प्रत्यक्षात शौचालय उभा केलेले नाही. अशा नागरिकांच्या घरी शौचालयाची पाहणी करावी व त्यांच्याकडून अनुदान परत घ्यावे. - संजय पवार.