धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव जिल्ह्यात सरकारी दुध संघ नसल्यामुळे दुध उत्पादकांना शासनाचे पाच रुपये अनुदान मिळणार नाही त्यासाठी खाजगी संस्थांनाही अनुदान लागु करावे, अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी राज्याची दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे केली आहे. 

या निवेदनात दुधगावकर यांनी म्हंटले आहे की, मागील पाच वर्षापासून धाराशिव जिल्ह्यात आसमानी आणि सुलतानी संकटाचा पाठशिवणीचा खेळ चालु आहे. यातच यावर्षी दुष्काळी परिस्थिती उदभवली आहे. शेती उत्पादनातून शेतकऱ्याच्या हाती फारसे काही लागले नाही. शेतकरी आर्थीक अडचणीत असताना शेतीला पूरक दुध व्यवसाय या जिल्ह्यात असून जवळपास चार ते पाच लाख लिटर दुध दररोज खाजगी संस्थांकडे दुध उत्पादक पाठवत आहेत. मागील तीन महिन्यांपासून दुधाचे दर कमी झाल्याने शेतीचा पुरक दुग्ध व्यवसाय अडचणीत आला आहे. या विरोधामध्ये आम्ही जिल्ह्यात वेळावेळी आंदोलने केली आहेत. शासनाने यावर उपाय म्हणून शासनाचे प्रतीलिटर पाच रुपये अनुदान सहकारी संघाला दुध विक्री झालेल्या उत्पादकांना देण्याचे जाहीर केले. परंतू या जिल्ह्यात एकही सहकारी दुध उत्पादक संस्था सुरु नसल्याने दुध उत्पादक त्यांचे दुध जिल्ह्याबाहेरील 19 संस्थांकडे पाठवत असल्यामुळे शासनाने दिलेल्या अनुदानाचा फायदा जिल्ह्यातील एकाही दुध उत्पादकाला होणार नाही. त्यामुळे शासनाने सहकारी संस्थेकडे दुध घालण्याची अट रद्द करुन प्रती लिटर पाच रुपये दुधाचे अनुदान दुध उत्पादकाच्या खात्यावर परस्पर जमा करण्यासंदर्भात आदेशीत करावे व जिल्ह्यातील दुध उत्पादकांना मदतीचा हात द्यावा, अन्यथा या विरोधात लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दुधगावकर यांनी दिला आहे.


 
Top