नळदुर्ग (प्रतिनिधी)- पावणेदोन महिन्याच्या वास्तव्यासाठी श्री खंडोबा देवाचे दि.14 डिसेंबर रोजी पहाटे नळदुर्ग (मैलारपुर) येथील खंडोबा मंदिरात आगमन झाले. श्री खंडोबा देवाचे नळदुर्ग शहरात आगमन होताच थंडीची तमा न बाळगता नळदुर्ग शहरवासियांनी देवाचे जोरदार स्वागत केले. यावेळी खंडोबा देवाचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
सालाबादाप्रमाणे याही वर्षी नळदुर्ग आणि अणदुरच्या मानकऱ्यांमध्ये लेखी करार झाल्यानंतर श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने दोन्हीकडील मानकऱ्यांचा मानपान करण्यात आला. यानंतर अणदुर येथील मंदीरातुन श्री खंडोबा देवाचे पालखीतुन नळदुर्गकडे मार्गक्रमण झाले. यावेळी नळदुर्ग शहरांतील श्री खंडोबा देवाचे मानकरी, नागरीक व वारू मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री खंडोबा देवाला निरोप देण्यासाठी अणदुर येथील नागरीकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहुन देवाला निरोप दिला.
पालखीतुन वाजत गाजत श्री खंडोबा देवाचे भल्या पहाटे नळदुर्ग शहरात आगमन झाले. यावेळी शहरवासियांनी श्री खंडोबा देवाचे जोरदार स्वागत केले. यावेळी खंडोबा मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर आकर्षक रांगोळी काढुन महिलांनी भल्या पहाटे श्री खंडोबा देवाचे औक्षण करून देवाचे दर्शन घेतले. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा नागरीक मोठ्या संख्येने खंडोबा देवाचे दर्शन घेण्यासाठी उभे होते.
श्री खंडोबा देवाचे नळदुर्ग (मैलारपुर) येथे आता पावणेदोन महिने वास्तव्य राहते. याठिकाणी दि.24, 25 आणि 26 जानेवारी 2024 रोजी श्री खंडोबाची यात्रा भरते. त्याचबरोबर आता दर रविवारी नळदुर्ग (मैलारपुर) येथील खंडोबा मंदिरात देवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. दि.14 डिसेंबर रोजी पहाटे 5 वा. श्री खंडोबा देवाचे नळदुर्ग (मैलारपुर) येथील खंडोबा मंदिरात आगमन झाले.
