धाराशिव (प्रतिनिधी)-  जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांना इलेक्ट्रॉनिक्स (डिजिटल) वजन काटे प्रत्यक्षदर्शनी लावावेत, तसेच साखर कारखान्याचे सध्याचे वजन काटे भरारी पथकामार्फत ताबडतोब तपासणी करावी, यासाठी जिल्हाधिकारी यांना आदेशित करावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी केली आहे, अन्यथा लोकशाही मागार्ने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पुणे साखर आयुक्त यांच्याकडे बुधवारी (दि.22) दिलेल्या निवेदनात दिला आहे.

या निवेदनात दुधगावकर यांनी म्हंटले आहे की, धाराशिव जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम 1 नोव्हेंबर 2023  पासून सुरू झालेला आहे. सालाबादाप्रमाणे शेतकरी आपला ऊस साखर कारखान्याकडे पाठवत आहेत. परंतु साखर कारखान्याकडे ऊस वाहन गेले असता संबंधित शेतकयांना उसाचे वजन प्रत्यक्ष दर्शनी दिसत नाही. ही बाब साखर कारखानदार व शेतकयांच्या दृष्टीने चुकीची आहे. जिल्हाधिकारी यांना याविषयी यापूर्वीदेखील लेखी पत्राद्वारे कल्पना दिली असताना या संदर्भात आजतागायत कोणतीही कारवाई झालेली नाही, अथवा साखर कारखान्यांनी प्रत्यक्ष दर्शनी इलेक्ट्रॉनिक्स वजनकाटे लावलेले नाहीत. जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांना इलेक्ट्रॉनिक्स (डिजिटल) वजन काटे प्रत्यक्षदर्शनी लावणे. तसेच साखर कारखान्याचे सध्याचे वजन काटे भरारी पथकामार्फत ताबडतोब तपासणी करावी, याबाबत जिल्हाधिकारी यांना आदेशित करावे अन्यथा लोकशाही मागार्ने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दुधगावकर यांनी दिला आहे.


 
Top