धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना, सरकारी नोकऱ्या व शैक्षणिक संस्थांमध्ये ठोस आरक्षण कायदा लागू करून गरीब कुटुंबांना आर्थिक सहाय्य मोठ्या प्रमाणात मिळण्यासाठी व त्यांचा जीवन स्तर उंचावण्यास मदत करण्यासाठी महाराष्ट्राला विशेष राज्याचा दर्जा देण्यात यावा यासाठी केंद्र सरकारकडे तातडीने मंत्रिमंडळाची बैठक घेऊन तसा प्रस्ताव पाठवण्याची मागणी समाजवादी पार्टीचे प्रदेश महासचिव तथा प्रवक्ते ॲड रेवण भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
महाराष्ट्र राज्याची सामाजिक व आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस खालावत चालली असून दारिद्य्र व उपासमारीची परिस्थिती उद्भवत असल्याचे चित्र समोर येऊ लागले आहे ,त्यामुळे राज्याला विशेष दर्जा देण्याची आवश्यकता आहे. राज्यातील सर्वच क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात अनुशेष भरून काढण्यासही राज्याची दमछाक होत आहे. त्यामुळे राज्याचे भीषण दारिद्य्र समोर येण्या अगोदरच केंद्र सरकारने विविध योजना पूर्ण करण्यासाठी भरघोस निधी देणे अत्यंत गरजेचे आहे .राज्यात लाखो कुटुंब हे बेघर व भूमिहीन असून त्यांना गरीबीसी मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत आहे. सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक स्थितीची आकडेवारी पाहिली तरी असे दिसून येते की महाराष्ट्रातही आर्थिक दृष्ट्या दुबळ्या घटकाची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे .राज्यात व केंद्रात भाजपा आघाडीचे सरकार असल्यामुळे महाराष्ट्राला विशेष राज्याचा दर्जा मिळण्यास कसलीही अडचण येणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक अनुशेष भरून काढण्यासाठी शासनाने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे, तरी महाराष्ट्र राज्याला विशेष दर्जा मिळण्यासाठी तातडीने मंत्रिमंडळाची बैठक घेऊन केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्याची मागणी ॲड.भोसले यांनी केली आहे.