धाराशिव (प्रतिनिधी) -अत्याचारपीडित, मतिमंद मुलींच्या शिक्षण, पालनपोषणाची जबाबदारी घेवून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे तसेच अत्याचारपीडितांच्या पालकांना येणाऱ्या अडचणीत मदत करणाऱ्या आळणी येथील तुळजाई प्रतिष्ठान संचलित स्वआधार मतिमंद मुलींच्या बालगृहाला राज्य बालहक्क संरक्षण आयोग, महिला व बालविकास आयुक्तालय आणि युनिसेफ यांच्यावतीने राज्यस्तरीय बालस्नेही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
बालकांच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात बुधवार, 22 नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या कार्यक्रमात महिला व बालविकासमंत्री महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते वडेट्टीवार, राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष ॲड. सुसिबेन शहा, महिला व बालविकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, विभागीय उपायुक्त हर्षा देशमुख यांच्या हस्ते संस्थेच्यावतीने सचिव शहाजी चव्हाण, प्रकल्प संचालक गुरूनाथ थोडसरे, मानसोपचारतज्ञ रूपाली कांबळे, शिक्षिका वैशाली पोफळे यांनी राज्य शासनाचा बालस्नेही पुरस्कार स्वीकारला.