नळदुर्ग (प्रतिनिधी)- ऐन दिवाळी सणात डाळी, साखर, बेसन, रवा, मैदा यांच्या किमती मोठ्याप्रमाणात वाढल्याने सर्वसामान्य नागरीकांना दिवाळीचा सण साजरा करताना कमालीची अडचण निर्माण होणार आहे. त्यामुळे केवळ महागाई वाढल्यामुळे सर्वसामान्यांची दिवाळी कडु होणार आहे.

सध्या राज्यातील अनेक भागांत दुष्काळाची परीस्थिती निर्माण झाली आहे. यावर्षी अतीशय कमी पाऊस झाल्यामुळे खरीप हंगाम पुर्णपणे वाया गेला आहे. त्याचबरोबर रब्बी हंगामाही जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुष्काळाचा सामना करत सर्वसामान्य नागरीक आपल्या कुटुंबांचा उदरनिर्वाह करीत असतानाच आज बाजारात जीवनावश्यक वस्तुंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे सध्या असाह्य झाले आहे. वास्तविक पाहता सरकारने जीवनाश्यक वस्तुंच्या किमती स्थिर ठेवणे गरजेचे होते. आज महागाईने कळस गाठलेला असताना एकही राजकीय पक्ष यासंदर्भात आवाज उठविताना दिसत नाही.

अगोदरच दुष्काळाचे सावट त्यातच पुन्हा महागाईचा चटका यामुळे दिवाळी आठ दिवसांवर आली तरी बाजारपेठा ओस पडल्याचेच दिसुन येत आहे. ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या हातामध्ये पैसा असतो त्याचवेळेस खऱ्या अर्थाने ग्रामिण भागांतील बाजारपेठा या गजबजलेल्या असतात. कारण शेतकरीच सढळ हाताने खर्च करत असतो. मात्र यावर्षी सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्याचबरोबर खरीपातील पैशाचे पीक म्हणुन ओळखले जाणारे मुग, उडीद हे पीक यावेळेस आलेच नाही त्यामुळे शेतकरी सध्या कंगाल झालेला आहे. सणासुदीच्या दिवसात तरी महागाई आटोक्यात आणण्यासाठी सरकारने उपाययोजना करणे गरजेचे होते.आज बाजारात हरभरा डाळ 90 रु. किलो, तुरडाळ 170 ते 180 रु. किलो, साखर 42 रु. किलो, बेसन 110 रु. किलो, रवा 38 रु. किलो, मैदा 40 रु. किलो, शेंगदाणे 140 रु. किलो.अशाप्रकारे महागाईने सध्या कळस गाठला आहे.


 
Top