नळदुर्ग (प्रतिनिधी)- तुळजापुर तालुक्यात आज गंभीर परीस्थीती निर्माण झाली आहे. तालुक्यात यावर्षी अत्यंत कमी पाऊस झाला आहे त्यामुळे खरीप हंगाम वाया गेला आहे.तर रब्बी हंगामाही वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असे असताना शासनाने तुळजापुर तालुक्यात दुष्काळ जाहीर केला नाही. त्यामुळे शासनाच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. शासनाने तात्काळ तुळजापुर तालुका दुष्काळग्रस्त तालुका म्हणुन जाहीर करून तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यासाठी शासनाकडे युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहेत.

तुळजापुर तालुक्यात सध्या अतीशय गंभीर परीस्थिती निर्माण झाली आहे. यावर्षी तालुक्यात विशेष करून नळदुर्ग पट्ट्यात पाऊसच झाला नाही. आज तालुक्यात पाण्याची अतीशय गंभीर परीस्थिती निर्माण झाली आहे.पावसाअभावी खरीप हंगाम पुर्णतः वाया गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. खरीप हंगाम वाया गेल्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. आज शेतकरी शासनाची मदत केंव्हा मिळेल याची वाट पाहत आहे. पाऊस झाला नसल्याने खरीपातील पिकांची वाढ खुंटली आहे त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे. पेरणीवर केलेला खर्चही निघाला नाही त्यामुळे शेतकरी हाताश झाला आहे. खरीप पाठोपाठ रब्बी हंगामाही वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाऊसच झाला नाही त्यामुळे केवळ पाऊस येईल या आशेवर शेतकऱ्यांनी रब्बीची पेरणी कांही ठिकाणी केली आहे.

अशी गंभीर परीस्थिती तालुक्यात निर्माण झालेली असताना तसेच तालुक्याची पैसेवारी 48.61 इतकी असतानाही तुळजापुर तालुक्यात सरकारने दुष्काळ का जाहीर केला नाही याबद्दल आश्चर्य वाटत आहे. वास्तविक पाहता पैसेवारी 50 पेक्षा कमी आली तर त्या तालुक्यामध्ये दुष्काळी परीस्थिती समजली जाते. असे असताना तुळजापुर तालुक्यात सरकारने दुष्काळ का जाहीर केला नाही? असा प्रश्न आज उपस्थित केला जात आहे.

येणाऱ्या काळात तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतीशय गंभीर होणार आहे. तालुक्यातील बहुतांश तलावामध्ये अत्यंत कमी पाणी साठा आहे. जमिनीतील पाणीपातळीही खाली गेली आहे. अशी परीस्थिती असताना तुळजापुर तालुका दुष्काळग्रस्त तालुका म्हणुन सरकारने का जाहीर केला नाही. कुठल्या नियमाने तालुका दुष्काळ यादीमधुन वगळण्यात आला आहे. सरकारने तात्काळ तुळजापुर तालुक्यात दुष्काळ जाहीर उपाययोजना सुरू करणे गरजेचे आहे. तालुक्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील हे तुळजापुर तालुक्यात दुष्काळ जाहीर व्हावा यासाठी शासनदरबारी युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या प्रयत्नाला लवकर यश येऊन सरकारने तुळजापुर तालुक्यात तात्काळ दुष्काळ जाहीर करून योग्य ते उपाययोजना सुरू करून तालुक्यातील नागरीक व शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम करावे.


 
Top