धाराशिव (प्रतिनिधी)-औद्योगिक व व्यावसायिक क्षेत्रातील मागणी लक्षात घेवून आवश्यक कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी तुळजाभवानी मंदीर संस्थानच्या माध्यमातून कौशल्य विश्वविद्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव विश्वस्त मंडळाच्या मान्यतेने शासनाकडे पाठविण्याच्या सुचना आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी जिल्हाधिकारी तथा तुळजाभवानी मंदीर संस्थानचे अध्यक्ष डॉ.सचिन ओम्बासे यांना केल्या आहेत. 

राज्यातील युवकांना एकात्मिक, समग्र स्वरूपाचे कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करून देणे आणि त्यांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त कौशल्याधारित उच्च शिक्षणाद्वारे रोजगारक्षम करण्याच्या हेतूने देशात कौशल्य विद्यापीठांची स्थापना करण्यात येत आहे. महाराष्ट्रात असलेले उद्योग समूहांचे मोठे जाळे व रोजगाराच्या प्रचंड संधी विचारात घेता येथील कुशल मनुष्यबळाची मोठी मागणी आहे. त्यामुळे उद्योगांच्या मागणीनुसार तांत्रिक क्षमता आणि विविध कौशल्यप्राप्त मनुष्यबळ निर्माण करून येथील युवकांना रोजगाराच्या संधी उपलबध करून देण्याचा या माध्यमातून मानस आहे. 

जिल्ह्याचे अर्थकारण प्रामुख्याने शेतीवर अवलंबून असून सातत्याने उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे येथील दरडोई उत्पन्न अत्यंत कमी आहे. औद्योगिकीकरण व सिंचनाच्या अभावामुळे येथे रोजगार देखील कमी आहेत. येथील युवकांना रोजगारक्षम बनविण्यासाठी कौशल्य वृध्दी आवश्यक असून यासाठी कौशल्य विकास विद्यापीठ सुरू करण्याचा विषय मंदीर संस्थानच्या बैठकीमध्ये घ्यावा व त्यास मंजूरी घेऊन प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याची विनंती आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. विख्यात विद्यापीठां सोबत याबाबत प्राथमिक चर्चा सुरू आहे. 

कौशल्य वृद्धीने अनेक युवकांना रोजगार व स्व-रोजगाराच्या संधी प्राप्त होणार आहेत. उद्योगांच्या मागणी प्रमाणे कोर्सेस व अभ्यासक्रमाची रचना करण्यात येणार असल्याने यातून 100 टक्के रोजगार मिळण्यावर भर राहणार आहे. 


 
Top