धाराशिव (प्रतिनिधी)- दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण, नवीन खरेदीचा उत्साह, फटाक्यांची आतषबाजी आणि फराळाची मेजवाणी म्हणजेही दिवाळी. दिवाळी म्हणजे हिंदूंचा सर्वात मोठा उत्सव, याच सणाला लहान मुलं मातीचा किल्ला बनवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठवणी जागवतात. रायगड, प्रतापगड किल्ल्यांची हुबेहुब प्रतिमा साकारताना चिमुकल्यांमध्ये दडलेल्या क्रिएटीव्ह कलेला वाव मिळतो. मात्र, सध्याच्या मोबाईल युगात आमचा दिवाळीचा किल्ला हरवला आहे. मात्र, धाराशिवमधील तुलसी सामाजिक संस्थेनं पुन्हा एकदा जुन्या दिवाळीची आठवण करुन देणारी स्पर्धा भरवली आहे.

तुलसी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून भाजप नेते नितीन काळे यांनी किल्ले बनवा स्पर्धेेचे आयोजन केलं आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी 11 हजार 1 रुपयांचे पहिले पारितोषिक ठेवण्यात आले आहे. तर, 7 हजार आणि 5 हजार अशी अनुक्रमे बक्षिसे आहेत. सध्याच्या पिढीला आमची दिवाळी माहिती नाही, दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये किल्ला बनवून सुट्टी संपेपर्यंत त्या किल्ल्याचे मावळे बवून आम्ही किल्ला सांभाळत होतो. मात्र, सध्याच्या काळात मुले ही मोबाईल फ्रेंडली झाली असून जुने खेळ आणि दिवाळीची परंपराही लयाला जात आहे. त्यामुळेच, ही किल्ले बनवा स्पर्धा आयोजित केल्याचं नितीन काळे यांनी सांगितले.

या स्पर्धेसाठी 5 नोव्हेंबरपासून नोंदणी सुरू झाली असून 15 नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करता येणार आहे. 8 ते 15 आणि 15 ते खुला अशा दोन गटांत ही स्पर्धा होत आहे. स्पर्धा नोंदणीसाठी पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला असून पुढील 8 दिवसांत मोठी नोंदणी होईल, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे. 


 
Top