अरविंद शिंदे

भूम (प्रतिनिधी)-भूम तालुक्यामध्ये चारा छावण्या सुरू करण्याची मागणी करण्यात आली असून, चारा छावण्या सुरू न केल्यास रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. 

यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे जनावरांना चारा व पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. त्यामुळे शेतीतील विहिरीला बोरवेलला पाणी नाही. नदी नाले कोरडेपट्ट असून तसेच पाऊस कमी झाल्यामुळे पिक व चारा निकृष्ट दर्जाचा आहे, पाऊस कमी झाल्यामुळे ज्वारीची रब्बीची पेरणीत घट झाली आहे. पाऊस कमी झाल्यामुळे शेतकऱ्याकडे शिल्लक चारा संपुष्टात आला आहे. तलावावरील लाईट कनेक्शन बंद आहेत व कॅनललाही पाणी सोडायचे संकेत नाहीत. तसेच दुष्काळ चोहीकडे पडल्यामुळे वैरण उपलब्ध नाही अशा स्थितीमध्ये शेतकरी संकटात सापडला आहे. भूम तालुक्यातील दैनंदिन जीवन आर्थिक दुग्ध व्यवसायावर अवलंबून आहे. भूम तालुक्यामध्ये पशुधनाची संख्याही जास्त आहे. तरी लवकरात लवकर चारा छावणी मंजूर करावी, अग्रीम पिक विमा द्यावा, दुधाचे भाव वाढवावे आदी मागण्या  करण्यात आल्या आहेत. दिनांक 16 नोव्हेंबर पर्यंत चारा छावणी मंजूर करण्यात आल्या नाही तर रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांच्या वतीने दिला आहे. यावेळी शेतकरी बाळासाहेब गवळी, अमोल वीर, बाबासाहेब नायकीदे, प्रशांत शेटे यांच्या सह पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top