धाराशिव (प्रतिनिधी)-वारंवार होणाऱ्या विजेच्या लपंडावाने त्रस्त झालेल्या धाराशिव तालुक्यातील ढोकी येथील शेतकरी, व्यापारी व नागरिकांनी दि.6 नोव्हेंबर रेजी रस्त्यावर उतरत रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनमुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
ढोकीसह परिसरात मागील आठ दिवसापासून विजेच्या लपंडाव चालू आहे. अपुऱ्या पावसामुळे जमिनीत ओलावा नाही. विहिरी, कुपनलिका, शेततळ्यांमधील पाणी देवून पिके जगवावी म्हटल तर वीज वारंवार खंडीत होत असल्याने पीक करपू लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत होता. यामुळे कंटाळलेल्या ढोकी येथील व्यापारी, शेतकरी व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दि. 6 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता महावितरण कार्यालयात कनिष्ठ अभियंत्यांना निवेदन देण्याचे ठरवले होत्रे. परंतु कार्यालयात एकही सक्षम अधिकारी नसल्यामुळे लातूर-बार्शी या महामार्गावर ठिय्या मांडला. वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता विकास जाधव व कोळी यांनी आंदोलनस्थी येवून मागण्यांचे निवेदन स्विकारले. लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेतले. निवेदनातून वीज पुरवठा सुरळीत करणे, ढोकी गावाचे स्वतंत्र फिडर करावे, जे वायरमन असतील त्यांनी ड्युटीच्या ठिकाणी मुक्कामी रहावे, सोलर योजना कार्यान्वित करावी, कार्यरत वीज वितरण कंपनीच्या सहायक अभियंत्यापासून वायरमनचे मोबाईल क्रमांक ग्रामपंचायतीसमोर लावण्याची मागणी करण्यात आली.