तुळजापूर (प्रतिनिधी)-येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे प्राध्यापक प्रबोधिनीचे आयोजन करण्यात आले होते. शरीरासाठी आवश्यक कॅलरिजप्रमाणे संतुलित आहार घेणे आवश्यक असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एम.मणेर यांनी केले.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात बोलताना ते म्हणाले की, आपल्या आहारात मैदा,साखर असे पदार्थ कमीत कमी असावेत आपणांस कॅलरीजचे प्रमाण लक्षात घेऊन आहार घेणे गरजेचे आहे,भारत सरकार पुरस्कृत फिट इंडिया ही संकल्पना याच अनुषंगाने राबविण्यात येत आहे,चालणे, साइकिलींग करणे, व्यायामात सातत्य असणे गरजेचे आहे,पूर्वी लोक पैज लावून गुलाब जामून खायचे पण आता पैज लावून खाण्याचे दिवस राहीले नाहीत, आहारात कडधान्य, उकडलेले अन्न घेणे आवश्यक आहे, मिठाचे प्रमाण कमी ठेवणे आवश्यक आहे, आधुनिक काळात जंक फूड चे आकर्षण विशेषतः तरुणांमध्ये जास्त आढळत आहे,पण यांचे दूरगामी परिणाम कर्करोगात होऊ शकते हे लक्षात घेणे गरजेचे आहे,शरीराचा उष्मांक संतुलित ठेवणे आवश्यक आहे,आपले पारंपरिक खाद्यान्न कधीही विसरू नये,तेलाविणा स्वयंपाक ही संकल्पना समाजात आरोग्यासाठी खुप महत्वाची मानली गेली आहे, विज्ञान युगात जाहिरातींच्या माध्यमातून लोकांना भिती दाखवली जाते,व आपण नको त्या भितीमुळे नको ते खाद्य पदार्थ घरी घेऊन येतो, आपल्या कडे जेवढे दुध उत्पादन होते त्याच्या दुप्पट दुध विक्री केली जाते याचा अर्थ लोकांनी समजून घेणे आवश्यक आहे, भरपुर खाण्याने आरोग्य सुधारते हा समज चुकीचा आहे असा अनमोल संदेश त्यांनी यावेळी दिला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्था विद्यासमिती सदस्य तथा प्राध्यापक प्रबोधिनी प्रमुख प्रा ज्योतिर्लिंग क्षीरसागर यांनी केले तर आभार डॉ बालाजी गुंड यांनी मानले.सदर प्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.