उमरगा (प्रतिनिधी)-बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथातील धम्म अधम्म व सदधम्म या विषयावर पाच दिवसाचे निवासी शिबिराचा समारोप बुधवारी दि 15 रोजी मोठया उत्साहात करण्यात आला. शिबिराचे नेतृत्व धम्मचारी यशोभद्र यांनी केले.
पाच दिवस चाललेल्या शिबिरात अतिशय सखोल,अभ्यासपूर्ण संदर्भासह प्रवचने देऊन शिबिरार्थींना यशोभद्र यांनी मंत्रमुग्ध केले होते.शिबिरार्थींनी धम्म काय अधम्म काय हे जाणून घेऊन धम्म सद्धम्म केव्हा होतो याचा अभ्यास करून आपले जीवन शील, समाधी, प्रज्ञा या तीन तत्त्वांची सांगड घालून जगणे आवश्यक आहे, तरच बाबासाहेबांचे भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न साकार होऊ शकते. असे प्रतिपादन केले. आपले जीवन शुद्ध परिशुद्ध जगण्यासाठी बुद्धांनी सांगितलेला निब्बाणप्राप्तीचा मार्ग हा प्रत्येक बौद्धांसाठी अनुकरणीय असून, तृष्णेचा त्याग करून नैतिक कर्म करत राहावे, मनाची मलीनता दूर करणे, मैत्रीने वागणे, माणसा माणसात भेद करणारे सर्व अडसर दूर करणे,माणसाचे मोठेपण हे त्याच्या कार्यावरून ठरवले तरच धम्म हा सद्मम्म रूपात येतो आणि त्याच्या परिपालनाने सर्व मनुष्यमात्राचे मंगल होते,या विषयीसखोल देसना दिली.
शिबिरात दररोज प्रवचने, गटचर्चा करून परिणामकारकपणे धम्माचरण करण्याची प्रेरणा धम्मचारी येशोभद्र यांनी दिली.शिबीरात दररोज सकाळी व सायं. ध्यानसाधनेचा सराव करून घेण्यात आला, रात्री बौद्ध धम्माच्या यशाची चतु:सुत्री या विषया वर अनुक्रमे धम्मचारी ज्ञानपालीत,धम्मचारी कल्याणदस्सी व धम्मचारी रत्नपालीत यांनी प्रेरणादायी प्रवचने दिली,संपर्क सराव,पूजा या सत्रातून धम्माप्रती श्रद्धा उत्पन्न होण्यास मदत झाली.
धम्मचारी प्रज्ञाजीत,धम्मचारी धम्मभूषण, धम्मचारी विबोध यांनी बौद्धधम्मातील मानवी मनाचे दर्शन घडवणारे 'भवचक्र' या प्रतिका विषयी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले, सर्व शिबिरांना नीतिमान व सदाचारी जीवन जगण्याची प्रेरणा देण्यात आली,धम्मचारी विरतकुमार ,यांनी ध्यान साधना व संपर्क सराव करून घेतला या धम्मशिबिरात उस्मानाबाद,उमरगा,लातूर,कळंब,मुखेड, मुरूम व इतर ठिकाणाहून 70 शिबीरार्थी सहभागी झाले होते. शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रा.प्रदीप गायकवाड,अशोक सावंत,दीपक शिवशरण,अक्षय गायकवाड,अजय गायकवाड,अमर कांबळे,अजिंक्य कांबळे,हरिदास कांबळे,तानाजी कांबळे, महादेव भोसले,जी.एल.कांबळे,जालींदर कांबळे,विश्वानंद गायकवाड,राजेंद्र सुरवसे, प्रीती मनोहर, सुनिता कांबळे, प्रजाताई कांबळे, मंदा टिळे आदी धम्ममित्रांनी परिश्रम घेतले.