उमरगा (प्रतिनिधी)- कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा व महाराष्ट्र राज्यातील हजारो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या उमरगा-लातूर महामार्गावरील श्री क्षेत्र बिरुदेव मंदिराच्या यात्रा उत्सवात यंदा भाविकांची मोठी गर्दी दिसून आली. मंगळवारी (दि.14) सांयकाळी धनगरवाड्यातून निघालेल्या श्रीच्या पालखी मिरवणूकीत ढोलाचा गजर, भंडाऱ्याची मूक्तपणे उधळण करत बिरूदेवाचा जयघोष करण्यात आला.
सोमवारी (दि.13) सांयकाळी बिरुदेव मंदिरातुन निघालेल्या पालख्यांनी शहरातील श्री. ग्रामदैवत महादेव मंदिराची भेट घेतल्या. तेथून धनगरवाड्यातील लक्ष्मी मंदिरात पालख्याचा मुक्काम होता. मंगळवारी पाडवा सणानिमित्त दुपारी चार वाजता धनगरवाड्यातून श्री च्या काठी व पालखीच्या सवाद्य मिरवणूकीत धनगर समाज बांधवांनी ढोलाच्या तालावर अनेक कसरतीचे सादरीकरण करुन उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. पालखी मिरवणुक वेशीत आल्यानंतर मानकरी विजयकुमार पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले, त्यानंतर पालख्यांची महादेव मंदिर भेट झाल्यानंतर प्रवेशद्वारावर मंदिराचे पुजारी जयराम सोनटक्के व भास्कर घोडके यांनी येणाऱ्या काळातील पीक - पाण्याची भविष्यवाणी सांगितली. आई - वडिलाची सेवा नित्यनियमाने केली पाहिजे, माणूसकी जपण्याचा धर्म सर्वांनी पाळला पाहिजे. संकटावर मात करण्यासाठी धार्मिकता जोपासली पाहिजे असा संदेश दिला. सायंकाळी सात वाजता हुतात्मा स्मारकाजवळील पुलाजवळ आरती झाल्यानंतर पालख्यांचे बिरुदेव मंदिराकडे प्रस्थान झाले. महावीर कोराळे, बाबुराव सुरवसे, चंद्रकांत मजगे, राजु दामशेट्टी, करबस शिरगुरे, राम पौळ, राजेंद्र सूर्यवंशी, बळीराम कोराळे, गोविंदराव घोटाळे, किशोर शिंदे, विनोद कोराळे, दत्तात्रेय शिंदे यांच्यासह भाविक उपस्थित होते. दरम्यान
मंगळवारी रात्री नऊ वाजता भंडारा आणि लोकराची उधळण व ढोलाचा गजर करीत विजापुरहून आलेले मानाचे बाशिंग बिरुबाच्या मूर्तीवर चढविण्यात आले. बुधवारी (दि.15) पहाटे मंदिराभोवती निघालेल्या छबिना मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी झाले होते. दिवसभर यात्रा भरलेली होती. श्री बिरुदेव मंदिर देवस्थान पुजारी मंडळाचे जालिंदर सोनटक्के, माजी नगरसेवक मधुकर घोडके, गोविंद घोडके एकनाथ घोडके, गोविंद घोडके, बालाजी घोडके, सुभाष आष्टगे, सोपान बिराजदार, दिलीप घोडके, डॉ. किशोर घोडके, संभाजी घोडके, सुनिल सोनटक्के, शाहू घोडके, मारूती लवटे, अंगद हुडे, धनराज घोडके अरूण गडदे यांच्यासह मंदिर समितीचे पदाधिकारी, पुजारी बांधवांनी यात्रा उत्सवाच्या यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला.