धाराशिव (प्रतिनिधी)-युवराज नळे हा समाजातील दुःख वेचून सामाजिक भान जागवणारा आगळावेगळा लेखक असून मानवी मनातील वेदना अनुभवताना जेंव्हा वर्तमान अस्वस्थ करतो तेंव्हा अशी साहित्यकृती जन्म घेते अशा शब्दांतून सोलापूर येथील जेष्ठ समीक्षक व विचारवंत प्रा. एम. आर. कांबळे यांनी 'अस्वस्थ वर्तमान' या पुस्तकाबद्दल आपले समीक्षण केले. तर समीक्षक प्रा. डॉ. अरविंद हंगरगेकर यांनी 'पाझर' या गझल संग्रहाचे समीक्षण करताना, “सामाजिक, राजकीय आणि प्रेम या सर्वांचे मिश्रण 'पाझर' मध्ये खुबीने गझलेत उतरवणारे धाराशिवचे अग्रगण्य गझलकार म्हणजे युवराज नळे असल्याचे सुतोवाच केले.
'अस्वस्थ वर्तमान' आणि 'पाझर' या दोन पुस्तकांच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. व्यासपीठावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ शिवाजी शिंदे, ॲड रमेश नाईकनवरे, मसापचे अध्यक्ष नितीन तावडे, सौ वर्षा नळे, कलाविष्कारचे सचिव शेषनाथ वाघ, राजेंद्र अत्रे, पं. दीपक लिंगे, डॉ रुपेशकुमार जावळे, समग्र प्रकाशनचे प्रकाशक दास पाटील जयश्री नलवडे, अतुल अजमेरा, आशिष देशपांडे यांच्या हस्ते साहित्यिक युवराज नळे लिखित 'अस्वथ वर्तमान' हा ललित लेख संग्रह व 'पाझर' या मराठी गझल संग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
लेखक युवराज नळे यांनी अकादमीची भुमिका प्रास्ताविकातून विशद करून आजपर्यंतचा अकरा पुस्तकासंदर्भातील लेखन प्रवास शब्दबद्ध केला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अविनाश मुंडे, कृष्णा साळुंके, युसुफ सय्यद, गणेश मगर, विक्रांत नळे, वैभव वाघचौरे, वेदांत गुरव, राजाभाऊ कारंडे, सुशील कुलकर्णी, भागवत घेवारे, प्रमोद बचाटे, शंकर बागल, अतुल कुलकर्णी, विनोद कुलकर्णी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत पडवळ यांनी तर आभारप्रदर्शन तौफिक शेख यांनी केले.