नळदुर्ग (प्रतिनिधी)- सालाबादप्रमाणे याही वर्षी ऐतिहासिक नळदुर्ग शहरात दिवाळी सणानिमित्त नळदुर्ग शहर शिवसेनेच्या वतीने (ठाकरे गट) भव्य ऐतिहासिक किल्ले बांधणी स्पर्धा व गवळी बांधवांसाठी म्हशी पळविण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये नळदुर्ग शहरातील युवक,नागरीकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शहर शिवसेना प्रमुख संतोष पुदाले यांनी केले आहे.
नळदुर्ग हे एक ऐतिहासिक शहर असुन शहरात प्राचिन व ऐतिहासिक किल्ला आहे. सालाबादप्रमाणे याहीवर्षी नळदुर्ग शहरात शहर शिवसेनेच्या वतीने (ठाकरे गट) दिवाळी सणानिमित्त मोहीम गडकिल्ल्यांची अंतर्गत भव्य ऐतिहासिक किल्ले बांधणी स्पर्धा 2023 ही घेण्यात आली आहे.या स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांनी आपल्या घरी किंवा परीसरात एकट्याने किंवा आपल्या सहकाऱ्यांसोबत किल्ला तयार करावा. किल्ला काल्पनिक व तयार असलेला नसावा.किल्ल्याची रचना भुईकोट, गडकोट व जलकोट यानुसार असावी.तयार करण्यात आलेल्या किल्ल्याची माहिती लिहलेली असावी. किल्ल्याची माहिती तोंडी सांगता आली पाहिजे.
किल्ला बांधणी स्पर्धेत प्रथम पारीतोषिक 5 हजार 1 रुपये, द्वितीय पारीतोषिक 3 हजार 1 रुपये व तृतीय पारीतोषिक 2 हजार 101 रुपये देण्यात येणार आहे. प्रथम क्रमांकाचे पारीतोषिक कफील मौलवी,कार्यकारी संचालक, युनिटी मल्टिकॉन्स कंपनी यांच्याकडुन देण्यात येणार आहे. द्वितीय पारीतोषिक माजी नगरसेवक दिलीप कुलकर्णी यांच्याकडुन तर तृतीय क्रमांकाचे पारीतोषिक पोलिस सहाय्यक उपनिरीक्षक प्रदीपसिंह ठाकुर यांच्याकडुन देण्यात येणार आहे.
दिवाळी सणानिमित्त गवळी बांधवांसाठी म्हशी पळविण्याच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी संतोष पुदाले,सरदारसिंग ठाकुर,सोमनाथ म्हेत्रे व नेताजी महाबोले यांच्याशी संपर्क साधुन आपली नावे नोंदवावीत असे आवाहन करण्यात आले आहे.