धाराशिव (प्रतिनिधी)-महावितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांना वारंवार कळवून, विनंती करून सुद्धा काजळा शिवारातील वीज पुरवठा सुरळीत न केल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांसमवेत बुधवारी (दि.8) कार्यकारी अभियंता यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले.

काजळा येथील शेतकऱ्यांना गेल्या वीस दिवसांपासून सुरळीत वीज पुरवठा होत नाही. त्यामुळे शेतीचे नुकसान होत आहे. याबाबत शेतकऱ्यांनी वारंवार महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना कळवून देखील कसल्याही प्रकारची दखल घेतली नाही. अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांच्या नेतृत्वाखाली काजळा गावातील शेतकऱ्यांनी थेट महावितरणचे कार्यकारी अभियंता यांच्या दालनात ठिय्या आंदोलन सुरू केले. 

काजळा येथील सबस्टेशनवरून शिवारातील शेतीसाठी वीज पुरवठा केला जातो. याच सबस्टेशनवरून कोळेवाडी व डकवाडी गावाचा अतिरिक्त भार जोडल्यामुळे वीज नेहमीच खंडित होत आहे. याकडे महावितरणकडून दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास आणून देत तात्काळ उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांनी दिला. तसेच शेतकऱ्यांनीही आक्रमक भूमिका घेतल्यानंतर कार्यकारी अभियंत्यांनी दोन दिवसांत हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. 

या आंदोलनात लालासाहेब मडके, राजेश शहागुंडे, गुरुप्रसाद करंडे, उमेश पवार, चांद तांबोळी, संतोष पाटील, मनोज कदम, चंद्रकांत लोमटे, दशरथ कोळी, बाळासाहेब शेषणी, रवींद्र आहेर, राजाभाऊ भोसले, जोतीबा जाधव, संजय माळी, महादेव माळी, शुभम इंगळे, बाळासाहेब देशमुख, संतोष पाटील, शुक्राचार्य शेडगे, आप्पा पवार, संतोष क्षीरसागर, रणजित पाटील, रामेश्वर शेळके, आत्माराम माळी, अरविंद माळी, महेश हजारे, गणेश आहेर, ज्ञानेश्वर शेळके, अविनाश शेळके, शुभम पाटील, राहुल बचाटे, तानाजी क्षीरसागर, खयुम सय्यद यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top