धाराशिव (प्रतिनिधी) - महाराष्ट्रात बहुतांश जिल्ह्यात 1972 पेक्षाही भीषण दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून जनावरांना चारा व पिण्याच्या पाण्याच्या टंचाईने आत्ताच उग्र रूप धारण केले आहे. त्यामुळे दुष्काळाने होरपळणारा शेतकरी जनावरांना चारा व पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यास  हतबल झाला आहे. त्यामुळे आता छावणी चालकाकडून होणारी लूटमार थांबविण्यासाठी छावणी ऐवजी जनावरांच्या दावणीला चारा व पाणी देण्याची मागणी समाजवादी पार्टीचे प्रदेश महासचिव तथा प्रवक्ते ॲड रेवण भोसले यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

यावर्षी अत्यंत कमी पावसामुळे मराठवाड्यासह महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यामध्ये हंडाभर पाण्यासाठी भटकावे लागत आहे .त्यातच जनावरांची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. जनावरांच्या चाऱ्यासाठी चारा डेपो किंवा चारा छावण्या सुरू करण्याची मागणी होत आहे. यापूर्वी जनावरांसाठी शासनाने छावण्या उघडल्या होत्या परंतु छावणी चालकांनी जनावरांना चारा व पिण्याच्या पाण्याची व्यवस्थित सोय न करता लाखो रुपयांचा गुरेढोरांच्या नावावर भ्रष्टाचार केल्याची अनेक प्रकरण उघड झाली आहेत, तसे गुन्हेही नोंद झाले आहेत. मराठवाड्यातील बहुतांश तालुके शासनाने दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले आहेत परंतु मागील दुष्काळाच्या वेळी अनेक संस्थांनी छावण्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व घोटाळे केल्याचे समोर आले आहे. जनावरांचे खोटे आकडे, पाण्याच्या टँकरच्या ज्यादा दाखवलेल्या खेपा, रोजगार हमीवर नसलेले मजूर यातून राजकीय दलाल लूटमार करत आहेत. दुष्काळाच्या नावाखाली चारा छावण्या काढण्यास छावणी चालकांना परवानगी देणे म्हणजे सरकारी मलिदा खाण्याचा परवानाच काढून दिल्यासारखे होईल. त्यामुळे जनावरांचा पशुसंवर्धन व महसूल विभागाने सर्वे करून शेत पशुपालकांच्या दावणीला असलेल्या जनावरांना चारा देण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. 1972 च्या दुष्काळात जनावरांना कडबा/ चारा व घरात धान्य होते परंतु निसर्गाच्या अव कृपेमुळे पावसाचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. .तरी यावर्षी शासनाने दुष्काळाने होरपळणाऱ्या चारा छावण्याऐवजी जनावरांच्या दावणीला चारा व तातडीने पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी ही ॲड.भोसले यांनी केली आहे.



 
Top