तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर, उमरगा, परंडा, भूम, कळंब ही सर्व तालुके अग्रीम पिक विम्या मध्ये समाविष्ट करून घेऊन संपूर्ण धाराशिव जिल्हा दुष्काळ जाहीर करा अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना धाराशिवतर्फे जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग अडवून रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा वजा निवेदन जिल्हाधिकारी यांना तुळजापूर तहसिलदार मार्फत जिल्हाअध्यक्ष रविंद्र इंगळे यांच्या नेतृत्वाखाली दिले.
ह्या वर्षीची खरीप व रब्बी दोन्ही हंगाम पावसामुळे पूर्णता शेतकऱ्यांच्या हातातून गेले आहेत उत्पन्न तर सोडाच परंतु सध्या परिस्थिती जनावरे सांभाळाचे सुद्धा अवघड झाले आहे तसेच प्रत्येक तालुक्यातील साठवून तलावातून शेतीसाठी पाणी घेऊन जाण्यासाठी शेतकऱ्यांना मनाई करण्यात आले आहे. सर्व विद्युत पंपाची वीज तोडण्यात आली आहे. कारण समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे सर्व तालुक्यात दुष्काळ सदृश्य स्थिती आहे. पुढील काळामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी मोठी समस्या निर्माण होऊ शकते म्हणून शासनाने ही कारवाई केली आहे मग असे असताना पाऊस कुठेही झालेला नसताना ही पाच तालुके अग्रीम मधून वगळलीच कशी..? व तसेच वेळोवेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना धाराशिव तर्फे आंदोलने करण्यात आली पंचनामे करण्यात आले. यावेळी संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी अशी ग्वाही दिली की ही सर्व तालुके अग्रीम मध्ये समाविष्ट झालेले आहेत परंतु ही निव्वळ शेतकऱ्यांची थट्टा आहे. राजकारण्यांप्रमाणे आता प्रशासकीय अधिकारी सुद्धा शेतकऱ्यांची थट्टा करत आहेत की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे परंतु हे सर्व आता स्वाभिमानी शेतकरी संघटना सहन करणार नाही जर हा निर्णय नाही बदलला तर आम्ही शेतकरी घेऊन खूप मोठ्या प्रमाणात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येतील व यामध्ये सर्व काही जिम्मेदारी ही शासनाची राहणार आहे तरी तात्काळ ही सर्व तालुके अग्रीम मध्ये समाविष्ट करून घ्यावी व तसेच संपूर्ण धाराशिव जिल्हा हा दुष्काळ जाहीर करावा अन्यथा हे शासनाला परवडणारे नाही याची नोंद घ्यावी कारण आता यापुढे स्वाभिमानी शेतकरी संघटना मोठ्या प्रमाणात आक्रमक होणार आहे. कारण राजकारण्यांप्रमाणे प्रशासकीय यंत्रणा सुद्धा शेतकऱ्यांची घोर थट्टा करत आहे. सध्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ सदृश्य स्थिती असताना असा निर्णय कसा काय घेऊ शकता ही हास्यास्पद बाब आहे. याबाबत लवकर निर्णय न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना धाराशिव तर्फे जिल्ह्यामध्ये कुठेही राष्ट्रीय महामार्ग अडवून रास्ता रोको करण्यात येईल याची नोंद घ्यावी. येणाऱ्या काळात जर शेतकऱ्यांवर असाच अन्याय सुरू राहिला तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या या अधिकाधिक वाढत जातील याची नोंद घ्यावी व तात्काळ वस्तुस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वरील प्रमाणे सर्व तालुके अग्रीम पीकविमा मध्ये समाविष्ट करून घ्यावे असे निवेदनात म्हटलं आहे.