धाराशिव (प्रतिनिधी)-जिल्ह्यात राज्यात सर्वप्रथम अग्रीम पिक विमा वितरणास सुरुवात झाली होती व साधारण 95 टक्के शेतकऱ्यांना ही रक्कम मिळाली आहे. तांत्रिक व इतर अडचणीमुळे जिल्हा बँकेत पीक विमा भरलेल्या व इतर काही शेतकऱ्यांना अग्रीम मिळण्यास विलंब झाला होता. मात्र कृषी आयुक्त व विमा कंपनीकडे सातत्याने पाठपुरावा करून या अडचणी दूर करत मागील दोन दिवसांमध्ये यातील बहुतांश शेतकऱ्यांना अग्रीम वितरित करण्यात आला आहे. आता केवळ 5 % च्या आसपास शेतकऱ्यांची अग्रीम प्रलंबित आहे. या शेतकऱ्यांना देखील लवकरच अग्रीम मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
जिल्ह्यातील 5 लाखा पैकी जवळपास 4 लाख 75 हजार शेतकऱ्यांच्या अर्जावर अग्रीम पीक विमा वितरित करण्यात आला असून आता केवळ 25000 अर्ज प्रलंबित राहिले आहेत. मागील दोन दिवसात बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रीम रक्कम जमा झाली आहे. 7 हेक्टर हुन अधिकचे क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष पाहणी करण्यात येत आहे. पाहणी झालेल्या शेतकऱ्यांना देखील मंगळवार पासून तातडीने विमा वितरीत करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.
तसेच ज्या शेतकऱ्यांची अग्रीम भरपाई रक्कम रु. 1000 पेक्षा कमी आहे, त्या शेतकऱ्यांची काही रक्कम शासनाकडून येणे बाकी आहे, जवळपास 5000 असे शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांसह उर्वरित सर्व शेतकऱ्यांना लवकरात लवकरात लवकर अग्रीम रक्कम वितरित करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.