धाराशिव (प्रतिनिधी)-आई येडेश्वरी देवी मंदिराकडे येरमाळा व मलकापूर कडून येणाऱ्या दोन्ही रस्त्यांच्या रस्त्यांच्या सुधारणे करिता 5 कोटी 94 लक्ष निधी मंजूर झाल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. यामुळे या दोन्ही गावातील ग्रामस्थ व भाविकांची मोठी गैरसोय दूर होणार आहे.

आई येडेश्वरीच्या दर्शनासाठी देशभरातून दरवर्षी लाखो भाविक येतात. या मंदिराकडे दोन्ही राष्ट्रीय महामार्गाकडून जाणाऱ्या रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाल्याने या गावातील ग्रामस्थानसह भाविकांची मोठी गैरसोय होत होती. आई येडेश्वरी च्या भाविकांची संख्या मोठी असून या देवस्थानच्या विकास कामांसाठी त्यांच्याच प्रयत्नातून पर्यटन विभागाच्या माध्यमातून रुपये 5 कोटी मंजूर करून घेण्यात आले आहेत. या निधी मधून घ्यावच्या कामांबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे आयोजित बैठकी मध्ये अनेक ग्रामस्थ व पूजाऱ्यांनी या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडे केली होती.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक  विकास बारकुल, माजी जि. प. सदस्य मदन बारकुल, उपसरपंच गणेश बारकुल यांचा या कामासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता. या अनुषंगाने त्यांनी ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन  यांच्याकडे आग्रही मागणी करून या रस्त्यासाठी निधी मंजूर करून घेतला आहे. त्यामुळे येरमाळा व मलकापूरच्या ग्रामस्थांसह येडेश्वरी देवी च्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची मोठी सोय होणार आहे.

पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासासाठी मोठे प्रयत्न सुरू असून श्रीक्षेत्र तुळजापूरच्या विकासासाठी रु 1328 कोटीच्या आराखडयास मंत्रिमंडळाने मंजूरी दिली आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीची धाकटी बहीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येडेश्वरी देवीच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह भाविक, पुजारी व ग्रामस्थांनी ग्रामविकास मंत्री ना. गिरिश महाजन  यांचे आभार व्यक्त केले आहेत.


 
Top