धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांच्या हस्ते आज 1 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सुमित माने या युवकाला निजामकालीन 1967 पूर्वीच्या नोंदीच्या पुराव्या आधारे कुणबी जात प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे,उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे,तहसीलदार शिवानंद बिडवे व प्रवीण पांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

राज्य शासनाने 31 ऑक्टोबर 2023 रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार न्या.संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखालील गठीत समितीच्या स्वीकृत केलेल्या पहिल्या अहवालाच्या अनुषंगाने समितीला आढळलेल्या कुणबी जातीचे प्रमाणपत्र सक्षम अधिकाऱ्याकडून देण्यास जिल्ह्यात सुरुवात झाली.   

जिल्ह्यातील मराठा समाजास मराठा -कुणबी,कुणबी - मराठा जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहित करण्यासाठी गठित निवृत्त न्या.संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने जिल्ह्यातील निजामकाळातील 40 लक्ष 49 हजार 131 नोंदी तपासल्या. 1967 पूर्वीच्या 459 नोंदी ह्या कुणबी असल्याचे आढळून आले.कुणबी जातीच्या नोंदी आढळून आल्या, त्या आधारावर कुणबी जात प्रमाणपत्र संबंधित सक्षम अधिकाऱ्यामार्फत देण्याची कार्यवाही जिल्ह्यात सुरू असल्याची माहिती डॉ.ओम्बासे यांनी दिली.

जिल्ह्यात कुणबी जातीच्या नोंदी आढळून आल्या. त्या आधारावर आज हे कुणबी जात प्रमाणपत्र वितरित करण्यात आल्याचे सांगून डॉ. ओम्बासे म्हणाले,ज्या कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत,त्या विविध विभागनिहाय व गावनिहाय प्रमाणित करून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर अपलोड केल्या आहे. काही विभागाचे याबाबतचे कागदपत्रे अपलोड करणे बाकी असून पुढील एक दोन दिवसात ते अपलोड करण्यात येतील.हे प्रमाणित कागदपत्रे नागरिकांसाठी उपलब्ध राहणार आहे. संबंधित गावात या कागदपत्रांचे चावडी वाचन व ग्रामसभेतून वाचन होणार आहे.जे लाभार्थी असतील त्यांचे अधिवास पुरावे व वंशावळ पुरावे जोडून जात प्रमाणपत्र मिळण्याची जी ऑनलाईन प्रक्रिया आहे ती करावी.आपले सरकार सेवा केंद्र किंवा सीएससी केंद्राच्या माध्यमातून अर्ज करावे.जास्तीत जास्त लाभार्थ्यांना 8 ते 10 दिवसात कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा प्रयत्न राहणार आहे.महसूल विभागाच्या चमुला आपल्याकडे असलेले पुरावे द्यावे.त्या आधारावर कुणबी जात प्रमाणपत्र देता येईल. असे जिल्हाधिकारी डॉ.ओम्बासे यांनी यावेळी सांगितले.


 
Top