धाराशिव (प्रतिनिधी)-वीजबिलाचा भरणा अधिक सुलभ व्हावा, यासाठी महावितरणने सातत्याने नवनवीन सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. यात महावितरणच्या महापॉवर पे वॉलेटची भर पडली आहे. धाराशिव जिल्हयात सध्या 67 वॉलेट धारक कार्यरत असून माहे सप्टेंबर मध्ये आठ हजार 371 वीजग्राहकांनी 77 लाख 37 हजार रूपयांचा भरणा वॉलेटच्या माध्यमातून केला आहे.

आवश्यक अटींची पूर्तता करणाऱ्या 18 वर्षांवरील कोणत्याही व्यक्तीला वॉलेटधारक होता येईल. यातून वीज ग्राहकांना विशेषतः ग्रामीण भागात वीजबिलाचा भरणा करणे सुलभ होण्यासह प्रती बील पावतीमागे पाच रुपये उत्पन्न मिळविण्याची संधी वॉलेटधारकास मिळेल. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली महापॉवर पे पेमेंट वॉलेट नव्याने गतीमन करण्यात आले आहे. या संधीचा लाभ ग्रामीण भागातील बेरोजगार युवक, छोटे व्यावसायिक व बचत गटांनीही घ्यावा असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे. 

वॉलेटधारक होण्यास इच्छुक असणाऱ्यांनी आधार कार्ड, पॅन कार्ड, जीएसटी क्रमांक, गुमास्ता प्रमाणपत्र, पत्त्याचा पुरावा, पासपोर्ट फोटो व रद्द केलेला धनादेश आदी आवश्यक कागदपत्रांच्या प्रती महावितरणच्य www.mahadiscom.in या संकेतस्थळावरील ओसीसीएस डॉट महाडिस्कॉम डॉट इन स्लॅश ओसीसीएस वॉलेट स्लॅश इंडेक्स या लिंकवर अपलोड करून ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे.  
Top