धाराशिव (प्रतिनिधी)-जिल्ह्यात सौर ऊर्जेसाठी पोषक वातावरण व पडीक जमीन मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यात रू. 5000 कोटीची मोठी गुंतवणूक व किमान  500 रोजगार उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने उद्योजकांची चर्चा झाली असून त्यांनी सहमती दर्शवली असल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. 

जिल्ह्यात आजवर 24 सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प असून या माध्यमातून 273 मेगावॅट वीज निर्मिती केली जाते. 300 पेक्षा जास्त दिवस स्वच्छ सूर्यप्रकाश असल्याने सौर ऊर्जा प्रकल्पांना येथे मोठा वाव आहे. जिल्ह्यात 1000 मेगा वॅट सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट असून यासाठी 3500 एकर पडीक जमिनीची आवश्यकता आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील 500 हून अधिकच्या युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहणार आहे. तसेच आनुषंगिक उपकरण निर्मिती व स्वयं रोजगार वाढण्यास देखील मदत होणार आहे.  

एकलगत जमीन मिळाल्यास मोठे उद्योजक येथे गुंतवणूक करण्यास तयार आहेत. काही उद्योजकांशी याबाबत चर्चा झाली असून त्यांनी गुंतवणूक करण्यास सहमती दर्शविली आहे. आ. पाटील यांनी राज्य स्थरावरील वरिष्ठ अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्या समवेत या बाबत चर्चा केली आहे व या कामी तज्ञ सल्लागार नेमण्यात येत आहेत. कौडगाव एमआयडीसी मध्ये महाजनकोचा 50 मे. वॅट क्षमतेचा सौर उर्जा प्रकल्प सुरू असून जिल्ह्यातील सर्व तालुक्यात सौर उर्जा प्रकल्प यशस्वी रित्या कार्यान्वित आहेत.



 
Top