तुळजापूर (प्रतिनिधी)- माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, सोलापूर यांच्या वतीने कोजागरी पौर्णिमानिमित्त दिनांक 26 ते 28 ऑक्टोबर 2023 पर्यंत आंतरराष्ट्रीय पौष्टिक भरडधान्ये आणि केंद्र शासनाचे 9 वर्ष सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण योजनांवर तामलवाडी टोल प्लाजा येथे तीन दिवसीय डिजिटल मल्टीमीडिया प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती केंद्रीय संचार ब्युरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण यांनी दिली आहे.

सदर प्रदर्शनाचे उद्घाटनासाठी जिल्ह्यातील खासदार, आमदार, जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन चोवीस तास सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.

या प्रदर्शनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णायक नेतृत्वाखाली भारताने माघील 9 वर्षात विविध क्षेत्रात केलेली कामगिरी, देशात जलदगतीने होत असलेली विकासकामे आणि धोरणांची माहिती सह भारतीय भरडधान्याचा इतिहास, ऐतिहासिक नावे, विविध दुर्मिळ प्रजाती आणि आरोग्यासाठी होणारे फायदे या विषयीची माहिती या प्रदर्शनामध्ये मांडण्यात आली आहे. सोबत गरीब वंचित, आदिवासी, महिला, युवा, शेतकरी, उद्योजक यांच्या विकासासाठी घेण्यात आलेले निर्णय, उज्वला गॅस योजना, डिजिटल इंडिया, पंतप्रधान पीक विमा योजना, किसान सन्मान योजना, आवास योजना, पीएम श्री योजना या सारख्या कल्याणकारी योजनांची माहिती डिजिटल स्क्रीनच्या माध्यमातून नागरिकांना पाहता येणार आहे.

केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाच्या  सोलापूर येथील,  केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीने व जिल्हा व पोलिस प्रशासन शासनाच्या सहकार्याने तामलवाडी टोल प्लाजा येथे 3 दिवसांकरिता मल्टिमिडीया चित्र प्रदर्शन भरविणयात येत आहे.

कोजागिरी पोर्णिमा निमित तुळजाभवानी मातेच्या दर्शनाकरिता पायी चालत येणाऱ्या महाराष्ट्र कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्रप्रदेश राज्यातील भाविकांना पौष्टिक भरडधान्ये आणि केंद्र शासनाने माघील 9 वर्षात घेतलेले निर्णय, धोरणे आणि विविध कल्याणकारी योजनांची माहिती व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय संचार ब्युरो, सोलापूरचे सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंबादास यादव यांनी दिले आहे.  


 
Top