नळदुर्ग (प्रतिनिधी)- गरीब व गरजु मुलींना शाळेत जाण्यासाठी सायकलीचे वाटप करीत असताना या मुलींमध्ये मला सावित्रीबाई फुले दिसत आहेत. त्यामुळे या मुलींना मोफत सायकल वाटप करीत असतांना आम्हाला आनंद होत आहे असे सेंटर फॉर ट्रान्सफॉरमिंग इंडियाच्या विश्वस्त चित्रलेखा पाटील यांनी नळदुर्ग येथे अटलास कॉपको (इंडिया) प्रा. लि. च्या वतीने शालेय विद्यार्थिनीना मोफत सायकल वाटप कार्यक्रमात बोलतांना म्हटले.
तुळजापुर तालुक्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या सहकार्याने सेंटर फॉर ट्रान्सफॉरमिंग इंडिया, अटलास कॉपको (इंडिया) प्रा. लि.या कंपनीच्या वतीने नळदुर्ग येथील बी. के. फंक्शन हॉल येथे दि.5 ऑक्टोबर रोजी अणदुर व जळकोट या दोन गटातील शाळेत जाणाऱ्या गरीब मुलींना मोफत सायकल वाटप करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन पृथ्वीराज पाटील, तुळशी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, जि. प.चे माजी सदस्य गणेश सोनटक्के, ऍड. दीपक आलुरे, माजी नगराध्यक्ष उदय जगदाळे, माजी नगरसेवक नय्यर जहागिरदार, संजय बताले, भाजपचे तालुका अध्यक्ष संतोष बोबडे, जि. प.च्या माजी अध्यक्षा अस्मिताताई कांबळे, विक्रम देशमुख, काशिनाथ शेटे, सुशांत भुमकर, धीमाजी घुगे, किरण खपले, नेताजी पाटील यांच्यासह सेंटर फॉर ट्रान्सफॉरमिंग इंडियाच्या चित्रलेखा पाटील, अटलास कॉपको (इंडिया) प्रा. लि. चे कॉर्पोरेट एच.आर. हेड.कबीर गायकवाड, अटलास कॉपको (इंडिया) प्रा. लि. चे सि. एस. आर. हेड अभिजित पाटील हे उपस्थित होते.
यावेळी बोलतांना नितीन काळे यांनी म्हटले की आमदार राणा जगजितसिंह पाटील हे विकास पुरुष आहेत. केवळ दीड वर्षात आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी धाराशिव जिल्हा तसेच तुळजापुर तालुक्याच्या विकासासाठी तब्बल 7 हजार 200 कोटी रुपयांचा निधी आणला आहे त्यामुळे दोनच दिवसापुर्वी धाराशिव येथे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर जिल्ह्याची भौगोलिक परीस्थिती लक्षात घेऊन अटलास कॉपको (इंडिया) प्रा. लि. ने मुलींना मोफत सायकल वाटप करण्याबरोबरच शिक्षणासाठी लागणाऱ्या साहित्याचेही वाटप करावे असे म्हटले.
यावेळी पृथ्वीराज पाटील, अभिजित पाटील यांच्यासह कांही मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अणदुर आणि जळकोट गटांतील 200 गरीब व गरजु मुलींना अटलास कॉपको (इंडिया) प्रा. लि. च्या वतीने मान्यवरांच्या हस्ते मोफत सायकलीचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दयानंद मुडके, अबुअलहसन रजवी यांच्यासह कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी परीश्रम घेतले.