धाराशिव (प्रतिनिधी)-मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा सहानुभूती पूर्वक विचार करून विदर्भातील शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे शेतसाऱ्याच्या 3 पट रक्कम शासनाकडे भरुन मराठवाड्यातील इनाम जमिनी वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये परावर्तीत करण्याच्या अनुषंगाने धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत विषय ठेवण्याची विनंती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली होती व या अनुशंगाने विदर्भा प्रमाणे मराठवाड्यातही कमी रकमेत इनाम जमिनी वर्ग 2 मधून वर्ग 1 करण्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. 

मराठवाडयातील शेतकरी शेकडो वर्षा पुर्वी मिळालेल्या इनाम जमीनी पूर्वापार कसत आहेत. शासनाच्या प्रचलित धोरणानुसार सदरील जमिनी नियमानुकूल करण्यासाठी 50% नजराणा शुल्क व शर्थ भंग 25% दंड रक्कम भरावी लागते. मराठवाड्या सारख्या कायम दुष्काळी व शेतकरी आत्महत्येचे प्रमाण अधिक असलेल्या भागातील शेतकऱ्यांना एवढी रक्कम भरणे अशक्यप्राय आहे.

विदर्भातील अमरावती व नागपुर महसुली विभागातील सर्व अनिर्बंधित भुमीधारी (भोगवटादार वर्ग-2) शेतकऱ्यांना शेतसाऱ्याच्या 3 पट रक्कम शासनाकडे भरुन भूमीस्वामी (भोगवटादार वर्ग-1) मध्ये परावर्तीत करण्यात आले आहे. यासाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित करून विशेष मोहीम राबविण्यात आली व सरसकट या सर्व जमीनी वर्ग-1 मध्ये रुपांतरीत केल्या गेल्या. 


 
Top