भूम (प्रतिनिधी)- सद्दाम पठाण यांची एक वर्षाची मुलगी सादिया सद्दाम पठाण राहणार शेकापुर तालुका भूम दोन दिवसापासून आजारी असल्याने तिला भूम येथे एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी आणले असता संबंधित डॉक्टरांनी या मुलीला श्वास घेण्यास त्रास आहे. तिला तात्काळ ग्रामीण रुग्णालय येथे ऑक्सिजनची सुविधा असल्याने तेथे घेऊन जाण्यास सांगितले. परंतु या ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर व ऑक्सिजन लावण्यासाठी असणारी व्यक्ती नसल्यामुळे अखेर त्या मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला.
मुलीच्या मृत्यू नंतर नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. संबंधित डॉक्टरांवर करवाई केल्याशिवाय हालणार नाही असा इशारा दिल्यानंतर भूमचे तहसीलदार सचिन खाडे, तहसीलदार संजय स्वामी, पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी पोलीस कर्मचारी यांनी मध्यस्थी करून सर्व लोकांची समजूत काढून कारवाईचा प्रस्ताव तयार करण्यास डॉक्टरांना सांगितले याच दरम्यान धाराशिवचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. इस्माईल मुल्ला यांनी मुलीवर केलेल्या उपचाराचे कागदपत्र व कोण-कोण उपस्थित होते या संदर्भातील हजेरीपत्रक ताब्यात घेतले.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख रंजीत पाटील यांनी आरोग्य मंत्र्यांचा राजीनामा मागितला. भूमचे मुस्लिम संघटनेचे पदाधिकारी असिफ जमादार, शिवसेना तालुकाप्रमुख शिंदे गट बालाजी गुंजाळ व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती निलेश शेळवणे, विशाल ढगे, प्रभाकर शेंडगे, सत्यजित तांबे, अरुण गाढवे, विठ्ठल बाराते, शेकापूरचे सरपंच अतीक् शेख, मोइज सय्यद, रफिक पिरजादे आदींनी संबंधित हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी अधिकाऱ्यांकडे मागणी केली. कारवाईच्या आश्वासनानंतर मयत सादिया पठाण याचे शव आई-वडिलांनी अंत्यविधीसाठी शेकापूर या ठिकाणी घेऊन गेले.