धाराशिव (प्रतिनिधी)-जिल्हा शासकीय रुग्णालयात औषध तुटवड्यामुळे सर्वसामान्य रुग्णांचे हाल होत आहेत. याकडे धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य मंत्री  डॉ. तानाजी सावंत यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणा देत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने रुग्णांकरिता लागणारी अत्यावश्यक औषधे भेट देऊन बुधवारी (दि.4) अनोखे आंदोलन करण्यात आले. 

शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांचा औषधे न मिळाल्याने मृत्यू झाल्याच्या घटना राज्यातील अनेक रुग्णलयात दररोज घडत आहेत. राज्यातील आरोग्य यंत्रणा सध्या व्हेंटिलेटरवर आहे. तरीही राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत याकडे दुर्लक्ष करून रुग्णांच्या जीवाशी खेळत आहेत. आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यात अशी परिस्थिती असेल तर राज्यातील इतर रुग्णालयांची स्थिती काय असेल? असा सवाल यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख सोमनाथ गुरव यांनी केला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ.शिल्पा दोमकुंडवार यांना अत्यावश्यक औषध गोळ्यांचे बॉक्स पक्षाच्या वतीने देण्यात आले. त्याचबरोबर कोलमडलेल्या आरोग्य यंत्रणेचे प्रतीक म्हणून पाणी नसलेले शहाळे आरोग्य मंत्री सावंत आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ यांच्याकरिता डॉ.दोमकुंडवार यांच्याकडे सोपविण्यात आले. 

शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, संपर्कप्रमुख मकरंद राजेनिंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात शिवसेना तालुकाप्रमुख सतीश सोमाणी, प्रवीण कोकाटे, संघटक बापू साळुंके, बाळासाहेब काकडे, रवी वाघमारे, पंकज पाटील, राणा बनसोडे, नितीन शेरखाने, बंडू आदरकर, अभिराज कदम, नाना घाटगे, निलेश साळुंके, निलेश शिंदे, राकेश सूर्यवंशी, बाबू पडवळ, गफूर शेख, अजिंक्य राजेनिंबाळकर, ओंकार बांगर, संजय भोरे, वैभव वीर, रोहीत कदम यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 


रुग्णांसह नातेवाईकही आंदोलनात

शासकीय रुग्णालयात आरोग्य तपासणी व उपचारासाठी आलेल्या अनेक रुग्णांना औषधे उपलब्ध नसल्याचे स्पष्टपणे लिहिलेले केसपेपर घेऊन अनेक रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक आंदोलनस्थळी दाखल झाले होते. त्यामुळे रुग्णालयात औषधे उपलब्ध नसल्याचा थेट पुरावाच मिळाला आहे. त्यामुळे औषध पुरवठा सुरळीत न झाल्यास आरोग्य मंत्री आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री यांना जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही असा सज्जड इशारा यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख सोमनाथ गुरव यांनी यावेळी दिला.


 
Top