धाराशिव (प्रतिनिधी)-कृषी महाविद्यालय आळणी, (गडपाटी) धाराशिव येथील सातव्या सत्रामध्ये शिकणाऱ्या कृषीदूत व कृषीकन्याकडून RAWE अंतर्गत मौजे गावसुद तालुका धाराशिव येथे दिनांक 26 सप्टेंबर रोजी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
सदरील कृषी मेळाव्यामध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री रवींद्र माने तसेच कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर येथील विषय विशेषज्ञ डॉ. भगवान अरबाड व डॉ. भैय्यासाहेब गायकवाड यांची प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थिती होती. कार्यक्रमांमध्ये शेतकऱ्यांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना रवींद्र माने यांनी शेतकऱ्यांना सध्याची पीक परिस्थिती, पीक विमा व शेती बद्दलच्या विविध योजना विषयी माहिती सांगितली. तसेच शेतकऱ्यांनी कुठलीही योजना मिळवण्यासाठी महाडीबीटी पोर्टल किंवा आपले सरकार यावर ऑनलाईन अर्ज करणे हे अनिवार्य असल्याचे प्रतिपादन केले.
चालू खरीप हंगामा मधील पिक विमा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी पिकनुकसानीची तक्रार ही 24 तासाच्या आत क्रॉप इन्शुरन्स ॲप द्वारे करणे गरजेचे असल्याचेही सांगितले. शेतकऱ्यांनी निसर्गाच्या अनियमनामुळे केवळ हंगामी पिकावर विसंबून न राहता संरक्षित पाणी वापर अर्थात शेततळे याचा वापर करून फळ पिकाची लागवड करावी व आपल्या उत्पन्नाचा नवीन स्त्रोत निर्माण करण्याकडे कल वळवावा असे नमूद केले. सोयाबीन पिकातील किडी व रोग व्यवस्थापन याबद्दल डॉ. भैयासाहेब गायकवाड यांनी शेतकऱ्यांना सोयाबीन पिकांमधील विविध किडींची ओळख त्यांचे काटेकोर नियोजन व व्यवस्थापन त्याचबरोबर जैविक तसेच रासायनिक निविष्ठांचा वापर करून आपल्या उत्पादनामध्ये भरीव वाढ करावी असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सातव्या सत्रातील विद्यार्थिनी कुमारी कृष्णाई इनामदार व अंकिता मोरे यांनी केले व आभार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. क्रांतीकुमार पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कार्यक्रम समन्वयक प्राध्यापक शेटे डी. एस., कार्यक्रम अधिकारी प्राध्यापिका सुमीता पाटील, प्राध्यापिका साबळे एस. एन. प्रा.दळवे एस. ए.,प्रा. सुतार एन. एस., प्रा. साठे एम.पी., डॉ. गांधले ए .जी. तसेच रावे अंतर्गत सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी परिश्रम घेतले