धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्हा मागास नाही, असे बोलणारे लबाड आहेत. डॉ. पद्मसिंह पाटील यांनी जिल्ह्याला विकासाच्या एका टप्प्यावर आणून ठेवले आहे. शाश्वत पाणी, हक्काचा रोजगार आणि सकारात्मक मानसिकता या तीन महत्वपूर्ण बाबींवर आपला भर आहे. त्यामुळे किती हजार कोटी रूपयांचा निधी आणला, यापेक्षा कोणते उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून विकासाचा हा प्रवास सुरू आहे, हे अधिक महत्वाचे आहे. ठाकरे सरकारच्या काळात रखडलेल्या जिल्ह्याच्या सगळ्या महत्वपूर्ण बाबींना आता वेग आला आहे. आपल्या सर्वांचे प्रेम आणि आशीर्वादामुळे जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलल्याखेरीज राहणार नाही, असा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला.

मागील 15 महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात विविध प्रकल्प आणि योजनांसाठी पाच हजार कोटींपेक्षा अधिकचा निधी खेचून आणल्याबद्दल आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा युथ फोरमच्यावतीने नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात रविवारी नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला आमदार शहाजीबापू पाटील, महंत तुकोजीबुवा, महंत मावजीनाथबुवा, जनता बँकेचे अध्यक्ष वसंतराव नागदे, अनंत आडसूळ, डॉ. सतीश कदम यांच्यासह शहर व परिसरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या सत्काराने आपल्याला हत्तीचे बळ मिळाले आहे. डॉ. पद्मसिंह पाटील यांनी केलेल्या विकासकामांची माहिती पुढील पिढीला होणे आवश्यक आहे. असे आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले. 


यावेळी आमदार शहाजी पाटील म्हणाले की, आपल्या राजकीय कारकिर्दीत विधानसभेसाठी पहिली उमेदवारी डॉ. पद्मसिंह पाटील यांनी दिली. डॉ. पाटील यांनी राज्याच्या राजकारणात दिलेले योगदान अनेक उदाहरणांसह शहाजीबापू पाटील यांनी यावेळी सांगितली. मराठवाड्याच्या विकासासाठी डॉ. पद्मसिंह पाटील, शिवराज पाटील चाकूरकर, शंकरराव चव्हाण, विलासराव देशमुख, शिवाजीराव पाटील निलंगेकर या पाच रत्नांनी मोठे योगदान दिले असल्याचे त्यांनी सांगितले. त्याच समाजसेवेचा वारसा आमदार राणाजगजितसिंह पाटील चालवत आहेत.  राज्याच्या मंत्रिमंडळात असा कर्तव्यदक्ष आमदार असायला हवा, असे मतही शहाजीबापू पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी प्रा. डॉ. गणेश बेळंबे, प्रा. डॉ. सतीश कदम, पत्रकार अनंत आडसूळ, जनता बँकेचे अध्यक्ष वसंतराव नागदे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रारंभी युथ फोरमच्या ऐश्वर्या सक्राते यांनी प्रास्ताविक केले. दौलत निपाणीकर यांनी सूत्रसंचालन तर आभार सूर्याजी गायकवाड यांनी मानले. 
Top