तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - 65 ( जुना - 9 ) वर असलेल्या जळकोट गावास खंडाळा तलावाऐवजी जळकोट पासून अंदाजे सहा ते सात किलोमीटर अंतरावर असलेल्या नळदुर्ग येथील बोरी धरणातून पाणीपुरवठा करावा अन्यथा दिनांक 25ऑक्टोबर 2023 रोजी जळकोट ग्रामपंचायत समोर लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा जळकोट येथील कृष्णात हरिदास मोरे यांनी संबंधित विभागाला लेखी निवेदन देऊन दिला होता.                       

त्यानुसार मोरे यांनी जळकोट ग्रामपंचायत समोर दिनांक 25 ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजता उपोषण सुरू केले होते. सदर उपोषणाची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने गंभीर दाखल घेऊन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे धाराशिव येथील उपविभागीय अभियंता सुजित जाधव, शाखा अभियंता के. एस. जाधव, चॉईस कन्सल्टन्सीचे प्रोजेक्ट मॅनेजर हिमांशू सिंग, सदर कामाचे गुत्तेदार आर. डी. कन्स्ट्रक्शनचे रोहित दीक्षित यांनी जळकोट येथे उपोषण स्थळी कृष्णात मोरे यांची भेट घेऊन त्यांच्या मागणीनुसार बोरी धरणातून पाणी पुरवठा करण्याबाबत येत्या 10 ते 15 दिवसात सर्वे करून नव्याने प्रस्ताव तयार वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवू असे मान्य करून तसे लेखी पत्र उपोषणकर्ते कृष्णात मोरे यांना ग्रामस्थांच्या उपस्थितीत दिल्याने मोरे यांनी पाण्यासाठी उपोषण केल्याने उपविभागीय अभियंता सुजित जाधव यांच्या हस्ते अमृत प्राशन करुनच तात्पुरते स्थगित केले.

याप्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य अर्जुन कदम,(बिराजदार), ग्रामपंचायत सदस्य गजेंद्र कदम, अंकुश लोखंडे, सय्यद तांबोळी, माजी ग्रामपंचायत सदस्य अनिल छत्रे, सोसायटीचे माजी चेअरमन आनंदराव पाटील, माजी व्हाईसचेअरमन हनुमंत सुरवसे, प्रतिष्ठित नागरिक सुनिल छत्रे, महेश कदम, इराण्णा स्वन्ने, ब्रम्हानंद कदम, संजय माने, वसंत करदुरे, अप्पू किलजे, संतोष वाघमारे, गणपत मोरे, ज्ञानदेव सोमवंशी, सहशिक्षक वसंत कदम (वाडीकर), निळकंठ इटकरी, बसवराज भोगे, वसंत सावंत, तुकाराम पट्टेवाले, तुकाराम कुंभार, सरदारसिंग ठाकूर, प्रदिप जोशी, तुळजापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील जाधव, उपस्थितीत होते.


 
Top