धाराशिव (प्रतिनिधी)-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे धाराशिव जिल्ह्याचे पहिले जिल्हा प्रचारक , वनवासी कल्याण आश्रमाचे पहिले महाराष्ट्र संघटन मंत्री , संघ प्रचारक स्वर्गीय बाळासाहेब दीक्षित यांच्या जीवनावरील अनुपमेय हा आत्मविलोपी हे पुस्तक म्हणजे त्यांच्या गुणांचं नाही तर एका संघ प्रचारकांच्या गुणांचे वर्णन असल्याचे प्रतिपादन जनजाती कल्याण आश्रम केंद्रीय कार्यकारणी सदस्य संघ प्रचारक श्री सुरेशराव कुलकर्णी यांनी केलं.ते आज धाराशिव इथं स्व. प्रमोद महाजन सभागृहात बाळासाहेब दीक्षित ज्ञानसाधना प्रतिष्ठान उदगीर च्या वतीने स्व. बाळासाहेब दीक्षित यांच्या जीवनावरील अनुपमेय हा आत्मविलोपी या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे धाराशिव जिल्हा संघचालक श्री अनिलराव यादव, श्री कमलाकर पाटील ,आप्पाराव कुलकर्णी, श्री देवेंद्र देवणीकर उपस्थित होते. यावेळी बोलताना सुरेशराव कुलकर्णी पुढे म्हणाले की, बाळासाहेब दीक्षित धाराशिव जिल्हा एकत्र असताना लातूर- धाराशिव जिल्ह्यात 17 वर्षे जिल्हा प्रचारक होते . याकाळात त्यांनी धाराशिव जिल्ह्यात संघ काम उभा करण्यासाठी खडतर प्रवास केला, सायकल वरूनही त्यांनी प्रवास केला. लातुरच्या विवेकानंद हॉस्पिटल ची उभारणी त्यांच्याच प्रेरणेतून झाली. तसंच ते जिल्हा प्रचारक असतानाच संघावर बंदी आली. देशात आणीबाणी सुरू झाली.

त्यानंतर वनवासी कल्याण आश्रमाचे पहिले संघटन मंत्री म्हणूनही बाळासाहेब दीक्षित यांनी काम केलं. वनवासी कल्याण आश्रमाचे काम कसं असलं पाहिजे याच मूर्तीमंत उदाहरण म्हणजे बाळासाहेब दीक्षित! वनवासी भागात बाळासाहेब दीक्षित म्हणजे कामाचा आधार होते. शाळा, आरोग्य केंद्र यासारखी काम त्यादरम्यान सुरू झाली. त्यांच्याच प्रेरणेने अनेक जण प्रचारक निघाले.

वनवासी कार्यकर्त्याला वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले. वनवासी भागात राहणाऱ्या लोकांना शहरी भागाशी जोडण्याचं काम त्यांनी केलं. तसेच वनवासी जनजाती, संस्कृती , वनवासी क्षेत्राविषयी समाजात आणि विशेषतः शहरी भागात योग्य जाणीवा निर्माण करण्यासाठी त्यांनी काम केलं, असंही ते यावेळी म्हणाले.

या कार्यक्रमाच प्रास्ताविक अप्पाराव कुलकर्णी आणि कमलाकर पाटील यांनी केलं त्यात त्यांनी बाळासाहेब दीक्षित यांनी धाराशिव जिल्ह्यात 1957 ते 1973 या काळात जिल्हा संघ प्रचारक म्हणून केलेल्या कामाच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. तर आभार देवेंद्र देवणीकर यांनी मानले. वैयक्तिक पद्य नारायणी कुलकर्णी हिने म्हटले. प्रारंभी भारत माता, स्व. बाळासाहेब दीक्षित यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. कार्यक्रमाला लातूर , धाराशिव जिल्ह्यातील संघ आणि संघ परिवारातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top