नळदुर्ग (प्रतिनिधी)- तुळजापुर तालुक्यातील मराठा समाज आरक्षणासाठी आता अधिक आक्रमक झाला असुन मराठा आरक्षण मिळेपर्यंत तालुक्यातील 22 गावांत आजी माजी मंत्री, खासदार, आमदार व राजकीय नेत्यांना गावांत प्रवेशबंदी करण्यात आली आहे. यांतील कांही गावांनी मतदानावरही बहिष्कार घातला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात तालुक्यात हा वणवा आणखी भडकण्याची शक्यता आहे.

चुलीत गेले नेते आणि चुलीत गेले पक्ष, मराठा आरक्षण एकच आमचे लक्ष... मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्ष व नेत्याला गावात प्रवेश नाही अशी आक्रमक भुमिका सध्या मराठा समाजाने घेतली आहे.

तालुक्यातील वागदरी, शहापूर ,येडोळा,माळुंब्रा, शिरगापुर, किलज, चिकुंद्रा, चव्हाणवाडी, तीर्थ (बु),तीर्थ (खु),उमरगा (चि.),आरळी (बु),आरळी (खु),सिंदफळ,कुंभारी, गंधोरा, देवसिंगा (तुळ),बसवंतवाडी, बोरनदीवाडी, सलगरा मड्डी, ढेकरी, धोत्री आणि तामलवाडी या गावात सध्या आजी माजी मंत्री, खासदार, आमदार व राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनानुसार मराठा समाजाने हा निर्णय घेतला आहे.

मराठा समाजाला ओबीसीचे आरक्षण देणे ही बाब अतीशय किचकट असुन कायद्याच्या चौकटीत बसवुनच सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यावे लागणार आहे त्यामुळे याला वेळ लागु शकतो. मात्र सध्या आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला असुन त्यांनी सध्या आंदोलनाचे विविध मार्ग अवलंबिले आहेत. सर्वपक्षीय नेते व पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली असल्यामुळे यामध्ये नेत्यांची मोठी गोची झाली आहे. हीच परिस्थिती कायम राहिली आणि भविष्यात याची दाहकता वाढली तर सर्वपक्षीय नेत्यांना घराबाहेर पडणे मुश्किल होणार आहे. त्यामुळे मराठा आरक्षणावर लवकर तोडगा निघणे गरजेचे आहे.


 
Top