धाराशिव (प्रतिनिधी) - मराठा समाजाच्या सामाजिक,शैक्षणिक, आर्थिक व सांस्कृतिक विकासासाठी राज्य शासनाकडून विविध योजना राबविण्यात येत आहे.या योजनांचा लाभ घेऊन मराठा समाजाने आपला सर्वांगिण विकास साधावा.असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी केले.

मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी करावयाच्या उपायोजनेबाबत नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

श्री.ओम्बासे पुढे म्हणाले, जिल्हाधिकारी कार्यालयात शिबिराचे आयोजन करून सारथी व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची माहिती नागरिकांना देऊन मराठा समाजातील लाभार्थ्यांचे अर्ज भरून घ्यावे. सारथी व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाची माहिती होण्यासाठी व्यापक प्रसिद्धी करावी. 4 नोव्हेंबर 2023 रोजी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिरात विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे.तरी या शिबिराचा जास्तीत जास्त मराठा समाजातील बांधवांनी लाभ घ्यावा.सारथी संस्थेमार्फत जिल्हा कौशल्य विकास विभागाने विविध योजनांची माहिती देण्यासाठी सेमिनारचे आयोजन करावे असे त्यांनी यावेळी सांगितले.

 डॉ.श्री.ओम्बासे पुढे म्हणाले,छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण व मानव विकास संस्था अर्थात सारथी अंतर्गत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीस सन 2023 - 24 या वर्षांमध्ये कुणबी, मराठा -कुणबी व कुणबी- मराठा अशा एकूण 20 हजार उमेदवारांना रोजगारक्षम  कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याकरिता कौशल्य प्रशिक्षण व अभ्यासक्रमाची नोंदणीचा फॉर्म विद्यार्थ्यांकडून घेण्यात यावे. सद्यस्थितीत सुरू असलेले राज्य लोकसेवा आयोग व संघ लोकसेवा आयोग व इतर स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी अर्ज भरून घेण्यात यावे. सारथी संस्थेचे माहितीपत्रक जास्तीत जास्त जणांना वाटप करावे. कौशल्य विकास प्रशिक्षण घेतल्यानंतर रोजगाराच्या संधीबाबत मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात यावे. शिबिराच्या ठिकाणी सारथी यशस्वी विद्यार्थ्यांचे बॅनर तयार करून लावल्यास भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांना व पालकांना सारथी संस्थेचे योगदान कळण्यास मदत होईल.सारथीचे कोचिंग घेण्यास प्रेरणा मिळेल. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत घेण्यात येणारे कार्यक्रम तालुकानिहाय प्रत्येक ग्रामपंचायतीपर्यंत योजनेची माहिती द्यावी असे ते म्हणाले.

तालुक्याच्या ठिकाणी मेळाव्याचे आयोजन करून त्याच ठिकाणी महामंडळाची नोंदणी करण्यासंदर्भात नियोजन करावे असे सांगून श्री.ओंम्बासे म्हणाले, महामंडळाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना त्वरित व्याज परतावा देण्यासंदर्भात कार्यवाही सुरू करावी. सर्व विभागात प्रचार प्रसिद्धीसाठी विविध माध्यमातून प्रचार प्रसिद्धी करण्यात यावी.मेळाव्याच्या ठिकाणी बँकेचे अधिकारी /कर्मचारी तसेच काही स्टार्ट-अपने बिजनेस छोटे उद्योगाबाबत आणि कृषी अधिकाऱ्यांमार्फत कृषीसंबंधी उद्योग सुरू करण्याकरीता आवश्यक माहिती देणारे कर्मचारी इत्यादी संबंधितांना उपस्थित राहण्याकरीता आवाहन करण्यात यावे. सारथी व अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची अंमलबजावणी करताना पात्र लाभार्थ्यांना तात्काळ लाभ मिळवून देण्याबाबतच्या शिबिराचे आयोजन करण्याची जबाबदारी संबंधित विभाग प्रमुखाची राहणार आहे.मेळाव्यामध्ये सहायक आयुक्त, कौशल्य विकास आणि त्यांच्याकडे टीएसपी यांनी येणाऱ्या उमेदवारांना मार्गदर्शन करण्यासाठी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे.या मेळाव्यासाठी बहुसंख्य मराठा समाज बांधव तसेच शाळाव महाविद्यालयातील विद्यार्थी व नागरीक यांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ओम्बासे यांनी केले आहे


 
Top