धाराशिव (प्रतिनिधी)-महाराष्ट्राचे राज्यपाल रमेशजी बैस यांना मंगळवार दि. 31 ऑक्टोबर रोजी भेटून राज्यात मराठा आरक्षणासंदर्भात चालू असलेल्या आंदोलनाची माहिती देवून मराठा समाजाला सरसगट आरक्षण द्यावे यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणी आपल्यासह 10 आमदारांनी लेखी पत्रद्वारे केली असल्याची माहिती आमदार कैलास पाटील यांनी दिली.

राज्यातील मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे दिनांक 29 ऑगस्ट 2023 पासुन आंतरवाली सराटी ता. अंबड जि. जालना येथे 17 दिवस आमरण उपोषणास बसले होते. त्यावेळी सरकारच्या वतीने 40 दिवसामध्ये मराठा आरक्षण देण्यात येईल असे आश्वासन दिले होते. दिनांक 24 ऑक्टोबर रोजी सरकारला दिलेली मुदत संपुनही राज्यसरकारने मराठा समाजास आरक्षणाबाबत ठोस कार्यवाही केलेली नसल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी दिनांक 25 ऑक्टोबरपासून पुनशच एकदा आमरण उपोषणास बसलेले आहेत. राज्यातही ठिकठिकाणी हिंसक आंदोलने चालुच आहेत. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाले आहे. मराठा तरुण आत्महत्येसारखी दुदैवी पावले उचलत आहेत. त्यामुळे मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यासाठी भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 174, खंड (1) व्दारे आपणास प्राप्त असणाऱ्या अधिकाराचा वापर करुन विधानसमेचे विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणी 10 आमदारांनी एका पत्राद्वारे केली आहे.

या पत्रावर सर्वश्री आमदार कैलास पाटील, राहुल पाटील, राजू नवघरे, माधवराव जवळगावकर, राजेश पाटील, मोहराव हंबडे, बाबासाहेब पाटील, बाळासाहेब आजबे, यशंवत माने, निलेश लंके यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


 
Top