धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर कारखान्याच्या 20 च्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ कारखान्याचे संस्थापक चेअरमन अरविंद जनार्धनराव गोरे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. अनुपमा अरविंद गोरे या उभयातांचे शुभहस्ते विधीवत पुजा होवुन संपन्न झाला.
सदर प्रसंगी कारखान्याचे संस्थापक चेअरमन अरविंदगोरे यांनी सांगितले की आंबेडकर कारखाना हा एक परिवार असुन सामुदायीक प्रपंच मिळवून चालवू. आपल्या परिसरात निसर्गाच्या अवकृपा झाल्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर असून दुष्काळ प्रवण भाग असल्याने अशा परिस्थिती ऊस उत्पादक शेतकन्यांनी कमी पाण्यात, कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येईल याचे नियोजन करणे गरजेचे आहे. शेतकन्यांनी पाणी उपलब्धतेच्या आधारावरच शेतीचे नियोजन करणे आवश्यक आहे. इतर पिकांपेक्षा ऊस पिकाचे स्थिर उत्पन्न असल्याने ऊस जोपासणे आवश्यक आहे. सामुदायिक इच्छा शक्तीच्या जोरावर आपण वाटचाल करत आलो आहोत. सद्यःपरिस्थिती पाहता कारखान्याची वाढलेली गाळप क्षमता त्यातच आपल्या भागात खाजगी साखर कारखानदारी, गुळ पावडर कारखान्याचे वाढलेले प्रमाण पाहता कारखाने 90 ते 100 दिवसही चालण्याची शाश्वती नाही. हीच परिस्थिती महाराष्ट्रातही आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी स्वतःहुन कारखाना उशिरा चालु करणेकरीता आग्रह धरणे आवश्यक आहे. कारण कारखाना उशिरा चालु केल्याने साखर उतारा चांगला मिळवून ऊसाला जादा भाव देणे शक्य होते. तसेच आपल्या जिल्ह्यात केवळ दोन कारखाने सहकारी तत्वावर चालणारे राहिले असुन ते जिवंत ठेवणेची जबाबदारी सभासद व ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आहे. सहकारी साखर कारखानदारीवर जसे सरकारची बंधने आहेत तशी खाजगी कारखान्यांना बंधने नाहीत. तसेच ऊस तोड मजुरांची अडचण विचारांत घेता हार्वेस्टर यंत्रासाठी साखर संघ, नॅशनल फेडरेशन यांचेमार्फत केंद्र व राज्य शासनाकडे अनुदानासाठी प्रयत्न केले. परंतु शासनाकडुन त्यासाठी कोणतीही तरतुद केली नाही. शासनाचे बदलते धोरण व निर्णय घेणेस होणारी दिरंगाई यामुळे साखर कारखानदारी अडचणीत येत आहे. गाळप हंगामात कारखाना ऊसातील पाण्यावर चालविणेत येणार आहे. तसेच ऑफ सिझनमध्ये डिस्टीलरी 100 दिवस चालविणेसाठी 2 शेततळ्यामध्ये पाण्याचा साठा करून ठेवलेला असून त्यातील पाण्याचा वापर करणार आहोत. पुढे बोलताना श्री. गोरे यांनी सांगितले की, कारखाना सुरुवातीपासुन सभासद व बिगर सभासद भेदभाव न करता ऊस दर एकच देत आहोत. चालू हंगामात नोंदलेल्या ऊसाचे 100 टक्के गाळप करण्याचे नियोजन केले असून त्यादृष्टीने ऊस तोड़ / वाहतुक यंत्रणा भरती करण्यात आली आहे. शेतकरी, सभासद व सहकारी यांचे साथीने येणारा हंगाम यशस्वी करु अशी ग्वाही दिली.
प्रस्तावीक भाषणात कारखान्याचे संचालक ॲड. चित्राव गोरे यांनी नवीन कार्यान्वीत केलेल्या प्रकल्पाची माहिती थोडक्यात विषद करून कारखाना सुरु करणेचेदृष्टीने दि.01 नोव्हेंबर पूर्वी सर्व कामे ट्रायलसह पुर्ण होतील असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कारखान्याचे व्हाईस चेअरमन मा.श्री. विलास ऊर्फ हनुमंत भुसारे हे होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कारखान्याचे संचालक अभिजीत माने व आभार प्रदर्शन संचालक ॲड. निलेश पाटील यांनी केले. कार्यक्रमास सर्व संचालक मंडळ, सभासद शेतकरी, हितचिंतक व कामगार, अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कारखान्याचा गळीत हंगाम 2023-24 चे बॉयलर पुजन प्रसंगी कारखान्याचे संस्थापक चेअरमन अरविंद गोरे, अनुपमा गोरे, कारखान्याचे संचालक व इतर मान्यवर.