तेर (प्रतिनिधी ) जागृत देवस्थान म्हणून धाराशिव तालुक्यातील जागजी येथील महालक्ष्मी मंदिर प्रसिद्ध असून नवरात्र महोत्सवास भाविक भक्त मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात. जागजी येथील 13 शतकातील महालक्ष्मी मंदिर असून या मंदिरात महालक्ष्मीची दगडी चतुर्भुज मूर्ती असून तिच्या हातात त्रिशुळ, डमरू असून जवळच विष्णूची मूर्ती शंख,चक्र, गदा,पद्म धारण केलेली विष्णू मुर्ती आहे.
प्राचीन काळी दंडकारण्यात इथं जाकासूर नावाचा दैत्य राहातं होता.या दैत्यांचा नाश करण्यासाठी देवी इथं प्रगट झाली.व तिनं जाकासूराचा वध केला.या जिकासूराच्या नावावरून गावात नाव जागजी असं पडलं.या मंदिरात मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमेला दर्शनासाठी भाविक भक्त मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात.नवरात्र महोत्सवात प्रतिदिन गावातील देवी मंदिरापासून महालक्ष्मी मंदिरापर्यंत छबिना मिरवणूक काढण्यात येते.महोत्सव गावकरी मोठ्या उत्साहाने साजरा करतात.या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे दगडी मंदिरावर असलेले विटाचे शिखर होय.गर्भगृह 4 बाय 4 मिटर असून गर्भगृहाचा चौथरा 2 बाय 2 मिटरचा आहे.या मंदिरासमोर दगडी बारव असून या बारवेस लक्ष्मीतीर्थ म्हणून ओळखले जाते. जवळपास 24 बाय 24 मिटरच्या क्षेत्रात बारवेचे बांधकाम आहे.या बारवेत चोवीस देवकोष्टे आहेत.पूर्वी या देवकोष्टकात विष्णूच्या चतुवीशति प्रकारात मोडणा-या मुर्ती असाव्यात.यातील कांहीं मुर्त्या इतरत्र हलविण्यात आलेल्या आहेत.बारवेच्या बाहेरील बाजूने पुष्पाची नक्षी आहे.तसेच अनेक प्राणी येथे कोरलेले आहेत.मंदिर प्रेक्षणीय आहे.