धाराशिव (प्रतिनिधी)- संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांचे कार्य आजच्या काळात नवीन पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर कालखंडात त्यांनी केलेले राष्ट्रीय, सामाजिक व शैक्षणिक कार्य हे अविस्मरणीय आहे असे प्रतिपादन व्याख्याते प्रा.डॉ.मच्छिंद्र नागरे यांनी केले. 

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था ,कोल्हापूर संचलित रामकृष्ण परमहंस महाविद्यालय उस्मानाबाद या ठिकाणी संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे या ग्रंथाचे लेखक व व्याख्याते प्रा.डॉ.मच्छिंद्र नागरे हे उपस्थित होते. यावेळी मराठवाडा विभागप्रमुख व रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांच्या समवेत संपूर्ण महाराष्ट्रभर श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था उभी करण्यामध्ये संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांचा सिंहाचा वाटा होता. भारतीय स्वातंत्र्य चळवळ, चले जाव आंदोलन , संयुक्त महाराष्ट्र चळवळ आंदोलन यामध्ये सुशीलादेवी यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. परमपूज्य डॉ.बापूजीं साळुंखे यांच्या निधनानंतर श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सर्व गुरुदेव कार्यकर्त्यांच्या त्या आईसाहेब बनल्या होत्या. यावेळी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे लपलेले अनेक पैलू प्रा.डॉ.नागरे यांनी उलगडून सांगितले.

यावेळी प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांच्या अनेक आठवणी सांगितल्या. संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांनी आपल्या कार्यातून आदर्श संस्काराचे उदाहरण दाखवून दिले. बापूजींची सावली व सर्व गुरुदेव कार्यकर्त्यांची माऊली असणाऱ्या संस्थामाता सुशीलादेवींच्या कार्यातून सर्वांनी प्रेरणा घ्यावी असे त्यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.बबन सूर्यवंशी व सर्व गुरुदेव कार्यकर्ते, विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. केशव क्षीरसागर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. माधव उगिले.यांनी केले. 


 
Top