धाराशिव (प्रतिनिधी)- मुक्ती संग्रामाचे अमृत महोत्सवी वर्षा निमित्त आज धाराशिव येथे ऑपरेशन पोलोच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्यात “ऑपरेशन पोलो “सायक्लोथॉन” (सायकल रॅली) चे धाराशिव ते तुळजापूर दरम्यान आयोजन जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज दि. 13 सप्टेंबर  रोजी सकाळी 7.00 वाजता करण्यात आले.

या कार्यक्रमास महसूल विभागातील कर्मचारी आणि नागरिकांनी सहभाग घेतला. यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे समवेत महसूल पोलिसांनी विविध कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी सायकल रॅली मध्ये सहभागी झाले होते. भारत माता की जय ... वंदे मातरम ....अशा घोषणांनी या सायकल स्वारांनी वातावरण दुमदुमून टाकले होते. या सायकल रॅलीची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालयातील स्मृती स्तंभास मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून तसेच स्वातंत्र्य सैनिक नायगावकर आणि बुबासाहेब जाधव यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आली.

या सायकल रॅलीचे अनुषंगाने प्रशासनाकडून विविध ठिकाणी ट्रॅफिकचे बंदोबस्त करण्यात आले. याप्रसंगी वडगाव येथील ग्रामस्थांनी या सायकल रॅलीचे भव्य स्वागत केले. सायकल रॅलीत सहभाग घेतलेल्या सायकल पटूंवर पुष्पवर्षाव करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी पारंपरिक नृत्य आणि लेझीम चे सादरीकरण केले. या रॅली सोबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांच्याकडून रेस्क्यू व्हॅन आणि रेस्क्यू टीम तसेच जिल्हा आरोग्य विभागाकडून रुग्णवाहिकेचे नियोजन करण्यात आले होते.


 
Top