धाराशिव (प्रतिनिधी)-भाजप नेते आणि धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक असलेल्या बसवराज मंगरुळे यांनी नुकतीच दिल्लीवारी केली. दिल्ली दौऱ्यात त्यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीगाठी घेत त्यांच्यासमवेत धाराशिव विकास आणि राजकीय विषयांवर चर्चा केल्याचं सांगण्यात येत आहे. दिल्लीत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत धाराशिवसाठी त्यांनी मंजूर केलेल्या 220 कोटी रुपयांच्या निधीबद्दल आभार मानले. तर, अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्याकडे धाराशिव जिल्ह्यासाठी बजेटमध्ये विशेष योजनांची मागणी केल्याचं त्यांनी फेसबुक पेजवरुन म्हटलं आहे. बसवराज मंगरुळे हे धाराशिव लोकसभा मतदारसंघातून भाजपाकडून इच्छुक असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. गेल्या काही महिन्यांपासून
गावोगावी दौरे, गाठीभेटी, राजकीय कार्यक्रमांना प्रमुख उपस्थिती आणि वरिष्ठांसोबत चर्चा, यामुळे मंगरुळे यांचं नाव धाराशिव जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चेत आहे. दोन दिवसांपूर्वी पंकजा मुंडेंनी त्यांच्या मुरुममधील निवासस्थानी भेट दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मनात काय चाललेलं असतं हे कोणालाही कळत नाही. मंगरुळे मोठ्या तयारीनिशी धाराशिवमध्ये फिरत आहेत. त्यामुळे, वरिष्ठांच्या आदेशावरुनच ते कामाला लागल्याचीही चर्चा जोर धरत आहे. त्यातच, दिल्ली वारीत त्यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरींसोबत जेवण केलं. निर्मला सितारमण यांच्यासोबत चहा-पानी तर माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांचीही भेट घेतली. त्यामुळे, मंगरुळे नेमकं काय संदेश देऊ इच्छित आहेत, हा प्रश्न उपस्थित होतोय.