तुळजापूर (प्रतिनिधी)-धाराशिव जिल्ह्यातील मंडळामधील वगळलेल्या वंचित गावांचा अग्रीम अनुदान यादीत समावेश करण्यात यावा, अन्यथा रविवार, 10 सप्टेंबर रोजी सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर नळदुर्ग येथील बस स्थानकासमोर रास्तारोको आंदोलन करणार असल्याचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
तुळजापूर तहसीलदारांमार्फत हे निवेदन सोमवारी (दि.4) जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, धाराशिव जिल्ह्यात दीड महिन्यापासून पावसाचा खंड पडला आहे. जिल्ह्यात पाऊस नसताना अनेक मंडळ विभागामध्ये चांगला पाऊस झाल्याचे दाखवून प्रशासनाने शेतकऱ्यांवर मोठा अन्याय केला आहे. 10 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता नळदुर्ग येथे सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष धनाजी पेंदे, जिल्हा संपर्कप्रमुख शहाजी सोमवंशी, विजय सिरसट, दुर्वास भोजने, संतोष भोजने या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांची स्वाक्षरी आहे.