धाराशिव (प्रतिनिधी)- श्रावणमासा निमित्त आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी प्रमाणे यावर्षीही महिलांसाठी जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील यांच्यावतीने जोतिर्लिंग घृष्णेश्वर दर्शन यात्रा आयोजित करण्यात आली होती.
सदरील दर्शन यात्रा दि.12 सप्टेंबर 2023 रोजी कळंब येथून पहाटे निघाली होती. कळंब शहरातील छत्रपति शिवाजी महाराज पुतळ्यास अभिवादन करून सहलीची सुरुवात झाली. यावेळी कळंब तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. श्रावण महिन्यानिमित्त यावेळी कळंब तालुक्यातील भाविक महिलांना बारा जोतिर्लिंगापैकी एक तीर्थक्षेत्र श्री घृष्णेश्वर देवस्थान जि. संभाजीनगर येथे दर्शनाची संधी उपलब्ध करून दिली होती. तालुक्यातील मोहा, मंगरूळ, येरमाळा, ईटकूर, डिकसळ, शिराढोण, नायगाव आणि खामसवाडी या जिल्हा परिषद गटास एक बस या प्रमाणे 8 व सीआरपी, आशा वर्कर्स आदींसाठी 1 बस या प्रमाणे 9 बसेसची सोय करण्यात आली होती.
घृष्णेश्वराचे दर्शन झाल्यानंतर शेकडो महिलांसह नजीकचे जागृत देवस्थान असलेल्या श्री भद्रा मारुतीचे घेतले. यामुळे महिलांचा आनंद द्विगुणित झाला. या सहलीमध्ये सहभागी झालेल्या महिलांनीही अर्चनाताई च्या माध्यमातून आपल्याला सहलीचा पहिल्यांदाच आनंद घेता आला व आपण सहल कशी असते हे पाहिल्याचे जाणीवपूर्वक नमूद केले. यावेळी घृष्णेश्वर देवस्थान प्रशासनाच्या वतीने अर्चनाताई पाटील यांचा सन्मान करण्यात आला.