धाराशिव (प्रतिनिधी) - मराठा समाजासाठी आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सराटी आंतरवाली येथे मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करत आहेत, त्यांच्या आंदोलनास पाठींबा म्हणून धाराशिव तालुक्यातील कामेगाव पाटील येथे बुधवारी (दि.13) धाराशिव-औसा राज्य मार्गावर शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी येत्या 30 दिवसापर्यंत मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा युवकांनी दिला आहे.

हे आंदोलन सकाळी 10 वाजता सुरु करण्यात आले. आंदोलनात कामेगाव, सांगवी, बोरगाव, समुद्रवाणी, राजुरी येथील तरुणांनी सहभाग नोंदवला होता. तब्बल एकतास हे आंदोलन चालल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी तरुणांनी जोरदार घोषणाबाजी करत मागण्यासाठी शासनाचे लक्ष वेधले. यावेळी मागण्याचे निवेदन मंडळ अधिकारी यांच्याकडे सुपर्त करण्यात आले. यावेळी सकल मराठा समाजाचे युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


 
Top